लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मंत्रिमंडळ फेररचना येत्या काळात होणारच आहे, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेले विधान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्याची 'गरमी' (म्हणजे राजकीय गरमी) कमी होऊ दे, मंत्रिमंडळ बदल होणारच, असे म्हणत सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड दिल्लीत श्रेष्ठींपर्यंत पोचले असल्याची माहिती नाईक यांनी दिली. 'लोकमत' कार्यालयाला काल भाजप प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी भेट दिल्यानंतर वार्तालापावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळ फेररचना कधी होणार? असे विचारले असता योग्य वेळी काय ते होईल, असे ते म्हणाले.
भंडारी समाज जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे, त्याबद्दल विचारले असता, पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा केली जाईल, असे यांनी सांगितले. आपल्याला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, अशी जर खंत समाजाला असेल तर प्रत्येक व्यासपीठावर मागणी करण्याचा अधिकार समाजाला आहे. तो नाकारून चालणार नाही.
दामू म्हणाले की, गोव्यात वगळे वातावरण आहे. जात, पात यापुरतेच मर्यादित नाही. जातीच्या आधारावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मडकईत सुदिन ढवळीकर, मयेत प्रवीण झांट्ये निवडून आले नसते. निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना जिंकून येण्याची क्षमता हा निकष असतोच. त्याचबरोबर पक्षाच्या विचारधारेशी तो सुसंगत आहे का, पक्षाकडील त्याची निष्ठा तसेच चारित्र्यही विचारात घेतले जाते, असे दामू यांनी एका प्रश्नावर सांगितले. ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील नव्या पिढीला संधी मिळायला हवी. भाजपने देशभर असे बदल केले आहेत. दामू एका प्रश्नावर म्हणाले की, इतर पक्षामधून भाजपात आलेले आमदार आता भाजपच्या शिस्तीत रुळले आहेत. भाजपच्या तिकिटावर निवडूनही आलेत. भाजपची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे.
कार्यकर्त्यांशी कनेक्ट झालो
भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वात आधी पक्ष अधिक बळकट कसा करता येईल याचा विचार केला. त्या अनुषंगाने तीन महिन्यांच्या कालावधीत १५ ते १६ कार्यकर्ते मेळावे घेतले. प्रमुख सदस्यता मोहीम पूर्ण केली व नंतर प्रत्येक भागातील मंडळ समित्या स्थापन केल्या. येणाऱ्या काळात याचा फायदा मते वाढविण्यास होणार आहे.
रोखठोक बोलतो, पण....
माझा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे, पण असे असताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याला मी प्राधान्य देत आहे. शेवटी मला काय वाटते किंवा मला काय हवे, यापेक्षा पक्षाला काय वाटते आणि पक्षाला काय हवे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रोखठोक बोलण्याने काहींना वाईट वाटत असेल, पण यातून सत्य तर बदलणार नाही ना? माझे एकच म्हणणे आहे की वैयक्तिक वैराचा परिणाम पक्षावर होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
काहींना राग आहे, पण साथ भाजपलाच
मी पक्षाचा जुना कार्यकर्ता. पक्षाला मोठा होताना मी पाहिले आहे. त्यामुळे त्या वेळेचे नेते, कार्यकर्ते जे दुरावले आहेत त्यांना भेटणे हे माझे कर्तव्यच आहे. राज्यभरातील ८० टक्के जुने नेते व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यादरम्यान माझ्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे या कार्यकर्त्यांना पक्षाबद्दल विविध गोष्टींसाठी राग आहेच, पण त्यांचा पिंड मात्र भाजपच आहे. ते अजूनही मनाने भाजपसोबतच आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन चालणे गरजेचे आहे.
भाषावाद संपलाय, तरीही युवकांशी बोलेन
मराठी राजभाषेचा वाद कधीच संपलेला आहे, तरीही मी युवा वर्गाशी बोलेन. त्यांना काय हवेय, हे जाणून घेईन. युवा वर्गाला यावर काय वाटते हे महत्त्वाचे आहे. काहीजण विषय आणायचा म्हणून आणून वाद निर्माण करत आहेत. भाजपची चौफेर घोडदौड चालू असतानाच हा विषय का उपस्थित व्हावा? असा सवाल करून केवळ राजकारण करण्यासाठी असे विषय आणले जातात, अशी टीका दामू यांनी केली. ४० वर्षे लढा देतोय, असे काहीजण म्हणतात याला मी जबाबदार आहे का? 'गोवा हितराखण मंच' स्थापन झाला त्यावेळी ही मंडळी कुठे होती? गोपाळराव मयेकर, शशिकांत नार्वेकर यांचा एक तरी माहितीपट का नाही आला? मराठी अकादमीच्या वास्तूची पर्वरीत दुर्दशा झालेली आहे, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. सरकारी मराठी अकादमी आणि खासगी मराठी अकादमी अशा दोन-दोन अकादमी यांना लागतात. मराठी अभिजात भाषा आहे. अडीच हजार वर्षांची परंपरा या भाषेला आहे. मराठीला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही. याउलट कोंकणी अजून आईच्या पदरातून बाहेर पडायचीच आहे. जे मराठी राजभाषा मागतात ते आपल्या मुलांना तसेच नातवंडांना फाडफाड इंग्रजी बोलण्यासाठी कॉनव्हेंटमध्ये पाठवतात, असा टोलाही नाईक यांनी लगावला.