भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारणार चैतन्य; अमित शाह यांच्या सभेला २० हजार लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:48 IST2025-10-02T11:48:13+5:302025-10-02T11:48:50+5:30
मंत्री, आमदार, प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी नेटाने लागले कामाला

भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारणार चैतन्य; अमित शाह यांच्या सभेला २० हजार लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी, दि. ४ रोजी गोवा भेटीवर येणार आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारणार आहे. या दिवशी दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या शाह यांच्या सभेला २० हजार लोकांची उपस्थिती लाभावी यासाठी मंत्री, आमदार पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
'माझे घर' योजनेच्या उद्घाटनासाठी शाह गोव्यात येत आहेत. हा सरकारी कार्यक्रम असला तरी पक्षाचे कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी झटताना दिसत आहेत. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरची तसेच दामू नाईक हे प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतरची ही पहिली मोठी जाहीर सभा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली. परंतु या निवडणुकीच्यावेळीही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची अशी मोठी सभा झाली नव्हती.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर साधारणपणे दहा ते बारा हजार लोकांची क्षमता आहे. परंतु शाह यांच्या सभेला याच्या दुपटीने लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने स्टेडियमबाहेर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली जाणार आहे. कार्यक्रम सरकारी असला तरी भाजपच्या प्रत्येक मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. मुख्यमंत्रीही नेटाने काम करत आहेत. सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभावी यासाठी काल, मंगळवारी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दामूंकडे सहा मतदारसंघ, आमदार, पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल स्वतः म्हापशात बैठक घेतली. शिवोली, कळंगुट, प्रियोळ, पणजी, ताळगांव अशा सहा मतदारसंघांमध्ये दामू बैठका घेणार आहेत. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांच्याकडे दोन मतदारसंघांची जबाबदारी आहे. माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, वास्कोचे दीपक नाईक, रुपेश कामत, सर्वानंद भगत यांच्याकडेही वेगवेगळ्याजबाबदारी दिली आहे.
'माझे घर' ची सविस्तर माहिती सभेत देणार
सावंत सरकारने सर्वसामान्यांच्या कल्याणार्थ आणलेली 'माझे घर' ही आतापर्यंतची सर्वांत मोठी योजना. कायदा दुरुस्ती विधेयके, परिपत्रकांचा 'आधार' देत अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे मोठे पाऊल सरकारने उचलले आहे. एक लाखाहून अधिक कुटुंबांना याचा लाभहोणार असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेचा शुभारंभशाह यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या हातूनच व्हावा, या हेतूने या सभेचे आयोजन केले आहे. अलिकडे भाजपच्या बड्या नेत्यांची सभा झालेली नाही. त्यामुळे शाह काय संदेश देतात, याबद्दल सर्वांनाच उत्कंठा आहे.
घरांच्या समस्या सोडविणार
अनधिकृत घरे कायदेशीर करणे, दुरुस्तीसाठीच्या परवानग्या सुलभ करणे आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घरांच्या समस्या सोडवणे हा योजनेमागील हेतू आहे. १९७२ पूर्वी बांधलेली व सर्वे प्लॅनवर असलेली घरे चौदा दिवसांच्या आत नियमित केली जातील. एकल निवासी युनिट्सची दुरुस्ती आता तीन दिवसांत मंजूर केली जाईल.
भूमिहिनांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे नियमितीकरण होईल. या योजनांची सविस्तर माहिती सभेवेळी देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभेल, अशी अपेक्षा आहे.
काय देणार कानमंत्र ? : सर्वांनाच कमालीची उत्कंठा
अलीकडच्या दोन वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी सभा गोव्यात झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. आगामी काळ हा जिल्हा पंचायत निवडणुका, पालिका निवडणुकांचा आहे. विधानसभा निवडणुकीलाही पाचशे दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे शाह काय संदेश देतात, याबद्दल पक्षात सर्वांनाच उत्कंठा आहे.