रवी नाईकांच्या संघर्षातूनच फोंडा मतदारसंघ भाजपकडे: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:57 IST2026-02-18T12:56:07+5:302026-02-18T12:57:02+5:30
रवींचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी पक्ष व सरकार कटिबद्ध असणार

रवी नाईकांच्या संघर्षातूनच फोंडा मतदारसंघ भाजपकडे: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : दिवंगत मंत्री रवी नाईक यांनी मोठ्या संघर्षातून फोंडा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला. त्यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार येथे पुन्हा निवडून आणणे गरजेचे आहे. रवी नाईक यांच्या स्वप्नातील फोंडा आम्हाला घडवायचा आहे. प्रगतीची दिशा अशीच ठेवण्यासाठी पुन्हा एकदा येथे कमळ फुलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
मंगळवारी त्यांनी फोंड्यातील नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेऊन आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप मंडळ अध्यक्ष हरीश नाईक, ज्येष्ठ नेते मनोहर आडपईकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, रितेश नाईक, उदय डांगी, विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, रॉय नाईक उपस्थित होते. दामू नाईक पुढे म्हणाले की, रवी नाईक यांनी मागच्या ४० वर्षात विविध क्षेत्रांत जे काम करून ठेवले आहे ते विसरणे अशक्य आहे.
रवी नाईक यांच्या लढ्यातून ज्यांना स्वतःची घरे मिळाली ते कदापि त्यांना विसरू शकत नाहीत. आपल्या संघर्षमय जीवनात त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जवळपास सर्व पदे भूषवली.
फोंड्याचा खरा विकास हा रवी नाईक यांनीच घडवून आणला. त्यामुळेच रवी नाईक यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी पक्ष व सरकार कटिबद्ध राहील. त्यांच्या प्रयत्नातून चालू असलेले विकासात्मक प्रयत्न कमी वेळेत पूर्ण करण्यात येतील.
फोंड्यातील भाजपचा उमेदवार कोण असेल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच आम्ही योग्य वेळी इथला उमेदवार जाहीर करू.
उमेदवार निवडताना भाजपची एक शिस्तबद्ध प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतूनच उमेदवार निवडला जाईल. उमेदवार निवडताना रवी नाईक यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता नक्कीच लक्षात घेणार.
एसटी बांधवांच्या उद्धारासाठी तिसरा जिल्हा
फोंडा हा तिसरा जिल्हा व्हावे, हे रवी नाईक यांचे स्वप्न होते. मात्र, फोंडा वगळून तिसरा जिल्हा झाला. या प्रश्नावर बोलताना दामू नाईक म्हणाले की, प्रशासनिक स्तरावर काही गोष्टींना तांत्रिक व सामाजिक बाबींचा तसेच भौगोलिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. एसटी समाजबांधवांचे वर्चस्व असेल असा एक जिल्हा घडवण्याच्या दृष्टीने तिसरा जिल्हा सध्या घडविण्यात आला आहे. एसटी समाजबांधवांचा उद्धार व विकास डोळ्यासमोर ठेवूनच तिसरा जिल्हा अस्तित्वात येत आहे.