बहुजन समाजाच्या नेतृत्वाला भाजपच सुरक्षाकवच देईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:01 IST2025-12-11T14:59:09+5:302025-12-11T15:01:02+5:30
खोतोडे-सत्तरी येथे जाहीर सभा; अनेक समर्थकांची उपस्थिती, स्थानिक ग्रामस्थांसोबतही साधला संवाद

बहुजन समाजाच्या नेतृत्वाला भाजपच सुरक्षाकवच देईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : 'गोव्यातील प्रत्येक गावात व प्रत्येक झेडपी मतदारसंघात आणि विधानसभा मतदारसंघात बहुजन समाजाचाच आवाज घुमायला हवा. बहुजनांना संघटित ठेवायला हवे.
भाजपच बहुजन समाजाच्या नेतृत्वाला योग्य ते सुरक्षाकवच देईल', असे प्रतिपादन मंत्री विश्वजीत राणे यांनी काल केले. राणे यांनी बहुजन समाजाचाच मुद्दा हाती घेतल्यामुळे सरकारमधील काही आमदार व मंत्र्यांमध्येही थोडी वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
नगरगाव झेडपी मतदारसंघात खोतोडेचा भाग येतो. तिथे काल सभेत राणे म्हणाले की, 'गोव्यात भाऊसाहेब बांदोडकरांनी बहुजन समाजाच्या कल्याणाचे काम केले. गोव्यात पोर्तुगीज काळातदेखील बहुजन समाजाने भारतीय संस्कृती टिकवून ठेवली.
पोर्तुगीजांना गोव्यात तिमय्यासारख्या व्यक्तींनी आणले होते. अशा तिमय्यासारख्या व्यक्तींना कधी कुणी सत्ता देऊ नये. गोव्याची सत्ता ही कायम बहुजन समाजाच्याच नेतृत्वाच्या हाती राहायला हवी' असे राणे म्हणाले.
प्रत्येक मतदारसंघात वाव मिळावा
'प्रत्येक मतदारसंघात बहुजन समाजाच्या नेतृत्वाला वाव मिळायला हवा. आम्ही बहुजन समाजातील उमेदवारांना पुढे आणतो. बहुजन समाजाच्या कल्याणासाठी भाजप सरकार काम करते. बहुजन नेतृत्वाला योग्य ते सुरक्षा कवच भाजपच देणार आहे, आणखी कुणाला ते जमणार नाही' असे राणे म्हणाले. त्यानंतर त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून समस्य जाणून घेतल्या.