भाजपचे आज शक्तिप्रदर्शन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:12 IST2025-10-04T12:11:32+5:302025-10-04T12:12:33+5:30
आगामी काळ निवडणुकांचा असल्याने या सभेच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन भाजप करणार आहे.

भाजपचे आज शक्तिप्रदर्शन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या हस्ते आज, शनिवारी आयोजित जाहीर सभेत 'माझे घर' योजनेचा शुभारंभ होणार आहे. हा सरकारी कार्यक्रम असला तरी भाजपने सुमारे २० हजार लोक जमवण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी काळ निवडणुकांचा असल्याने या सभेच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन भाजप करणार आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दुपारी ४.३० वाजता सभा होणार आहे. सभेच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. स्थानिक नेत्यांनी चाळीसही मतदारसंघ पिंजून काढले आहेत. सुमारे १४० बैठका झाल्या. भाजपची युवा ब्रिगेडही सक्रीयपणे फिल्डवर काम करत आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिसांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले. वाहतूक व्यवस्थेत थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोयही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या आवारात करण्यात आलेली आहे.
विविध १८ योजना, प्रकल्पांचा समावेश
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने 'माझे घर' योजना आणली. एक लाखाहून अधिक कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. या योजनेबद्दल सभेत माहिती दिली जाईल. तसेच गोवा दंत महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे, कांपाल येथील स्मार्ट सिटी स्टेडियमचे, पणजी येथील जुन्ता हाउस इमारतीची पायाभरणी आणि परशुराम स्तंभाची पायाभरणी आभासी पद्धतीने त्यांच्या हस्ते केली जाईल, एकूण १८ योजना, प्रकल्पांचा कार्यक्रमात समावेश असेल.
सभेसाठी वाहतूक मार्गात बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताळगाव येथील डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयएनएस हंसा - दाबोळी विमानतळ - चिखली मार्ग - एनएच ३६६ -नवा जुवारी पूल - गोमेकॉ - गोवा विद्यापीठ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शा यांच्या सभेसाठी पोलिसांनी कडेकोड पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. आयएनएस हंसा ते मुखर्जी स्टेडियम दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल असे वाहतूक पोलिस अधीक्षक सुबोध शिरवईकर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
कार्यक्रमासाठी दक्षिण गोव्यातून घेऊन येणारी वाहने गोवा विद्यापीठ, गोमेकॉमार्गे वळवली जातील. बसेस, चारचाकी व दुचाकींसाठी स्टेडियम परिसरातील खुल्या जागेत, विद्यापीठाचे क्रिकेट मैदान, स्टेडियम परिसरातील पाण्याच्या टाकीसमोरील खुल्या जागेत, आयटी हॅबिटेट तसेच ओव्हरहेड पाण्याची टाकी परिसरात पार्किंगची सोय केली आहे. तर उत्तर गोव्यातून येणारी वाहने बांबोळी येथील गोमेकॉ अंडरपास, विद्यापीठ व उद्यान मार्गे जातील.
२० हजारांचे लक्ष्य पार करू : दामू
फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरची तसेच दामू नाईक हे प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतरची ही पहिली मोठी जाहीर सभा आहे. त्यामुळे नाईक यांनी विशेष रस घेतला आहे. नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, '२० हजार लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य पार करू. सर्व मतदारसंघात भाजप मंडल, बूथ स्तरावरही बैठका झाल्या आहेत. सहा मतदारसंघांची जबाबदारी माझ्याकडे होती. काल मी पणजी व ताळगाव या दोन मतदारसंघांमध्ये बैठका घेतल्या. मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांना काम वाटून दिलेले आहे. आतापर्यंत १४० हून अधिक बैठका झालेल्या आहेत.'