भाजपची दुसरी यादी आज येणार, मगोला मोरजीसह तीन जागा; काही अपक्षांनाही पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:01 IST2025-12-02T16:01:18+5:302025-12-02T16:01:46+5:30
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील १९ उमेदवारांची बैठक भाजप मुख्यालयात झाली.

भाजपची दुसरी यादी आज येणार, मगोला मोरजीसह तीन जागा; काही अपक्षांनाही पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये भाजपकडून मगो पक्षाला मोरजी मतदारसंघासह तीन जागा देण्यात आल्या आहेत. तर, काही मतदारसंघांमध्ये भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देईल. उर्वरित उमेदवारांची यादी आज, मंगळवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
भाजपने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील १९ उमेदवारांची बैठक भाजप मुख्यालयात झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या बैठकीत उमेदवारांना मार्गदर्शन केले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी उमेदवारांना आचारसंहितेचे पालन, प्रचाराचे नियोजन, बूथ व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. पुढील रणनीती कशी असावी, याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
केंद्र तसेच राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ आतापर्यंत अनेकांना झालेला आहे, त्याविषयी प्रचारादरम्यान लोकांना माहिती द्यावी, असे उमेदवारांना सांगण्यात आले. 'लोकमत'ने प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'आमचे ८० टक्के उमेदवार
नवीन आहेत. त्यांना या बैठकीत आम्ही मार्गदर्शन केले. काय करावे, काय करू नये, यासंदर्भात सांगितले.
दरम्यान, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई पत्रकारांच्या प्रश्नावर म्हणाले की, 'आम्ही फक्त निवडणुकीदरम्यानच नाही तर रोज लोकांशी जोडलेले राहतो'.
काँग्रेसने काय दिवे लावले हे त्यांना विचारा : दामू
राज्य निवडणूक आयोगाच्या कामात भाजप हस्तक्षेप करत असल्याचा विरोधी काँग्रेसकडून जो आरोप होत आहे त्याबद्दल विचारले असता प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की 'गेल्या २० ते २५ वर्षात काँग्रेसने काय दिवे लावले, हे त्यांना आधी जाऊन विचारा. काँग्रेसला लोक दारात उभे करत नाहीत. बिहारात केवळ सहा जागा मिळाल्या, त्यामुळे आम्ही ६ लाडू पाठवले. मी कधीही बालीश विधाने करत नाही.'
पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
जि. पं. निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम काल, सोमवारपासून सुरू झाले. परंतु, पहिल्या दिवशी एकही अर्ज आलेला नाही, अशी माहिती सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून देण्यात आली.
'उर्वरित उमेदवारांची आमची यादी आज, मंगळवारी आम्ही जाहीर करणार आहोत. आठ ते दहा जागांवर भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष