आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:34 IST2025-04-15T12:33:13+5:302025-04-15T12:34:09+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम; विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

bjp politics on dr babasaheb ambedkar bhavan in goa congress alleges | आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आंबेडकर भवनावरून भाजप सरकार राजकारण करत असून, गेली अनेक वर्षे आंबेडकर भवन बांधण्याचे आश्वासन देत आहे. या भाजप सरकारकडून दलितांची फसवणूक केली जात आहे. भाजपकडून दलितांचा मतासाठी वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४व्या जयंतीनिमित्त पणजीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसच्यागोवा प्रभारी अंजली निंबाळकर, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस, आमदार कार्ल्स फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे हिंदुत्व खोटे : अंजली निंबाळकर

काँग्रेसच्या गोवा प्रभारी अंजली निंबाळकर म्हणाल्या, भाजप प्रत्येक वेळी खोटे हिंदुत्व पसरवत देशभर मते मिळवत आहे. लोकांमध्ये, जाती धर्मामध्ये फूट घालत आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा ते योग्य वापर करत नाहीत. बाबासाहेबांनी दलित समाज पुढे यावा, त्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्य केले होते; पण भाजपने दलितांच्या विकासाचा कधी विचार केला नाही.

भीतीचे वातावरण : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अनादर केला आहे. आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार दिला होता; पण आता भाजप सरकारकडून देशभर जात, धर्म, भाषा याच्यावर लोकांना वेगळे केले जात आहे. भाजपने जातीवर राजकारण करून लोकांना नाहक त्रास दिला आहे. दलितांवर या भाजप सरकारने अन्याय केला आहे. भाजप सरकारने हुकूमशाही राबविली आहे. जे कोण सरकारविरोधात बोलतात त्यांना कायद्याची भीती दाखविली जाते. त्यामुळे आज कोणीच सरकार विरोधात बोलायला जात नाही. अल्पसंख्याक लोकांमध्ये या भाजप सरकारने देशभर भीतीची वातावरण तयार केले आहे.

भाजपकडून दलितांची फसवणूक : पाटकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने दलितांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेली ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर आहेत; पण सरकारला आंबेडकर भवन बांधता आले नाही. ते नुसती आश्वासने देत आहेत. आताही त्यांनी सहा महिन्यांत पायाभरणी करणार, असे म्हणत लोकांची दिशाभूल केली आहे. भाजप बाबासाहेबांचे विचार, संविधान हे मानत नाही. सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी कामे केली. सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्हाला हवे.
 

Web Title: bjp politics on dr babasaheb ambedkar bhavan in goa congress alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.