भाजप-मगो युती अबाधित; दामू नाईक व दीपक ढवळीकर यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:15 IST2025-04-04T12:14:54+5:302025-04-04T12:15:49+5:30
दामू नाईक यांनी या बैठकीविषयी सायंकाळी 'लोकमत'ला सांगितले की, सध्या वस्तुस्थिती अशी आहे की भाजप व मगो हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत.

भाजप-मगो युती अबाधित; दामू नाईक व दीपक ढवळीकर यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गुरुवारी भाजपच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोघांचीही बैठक झाली. युती अबाधित आहे हे नंतर जाहीर करण्यात आले.
दामू नाईक यांनी या बैठकीविषयी सायंकाळी 'लोकमत'ला सांगितले की, सध्या वस्तुस्थिती अशी आहे की भाजप व मगो हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. जरी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी युती झाली नव्हती तरी नंतर ती झाली व मगो पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे युती व्यवस्थित आहे आणि आमच्यामध्ये समन्वयही आहे. भविष्यात काय होईल ते काळानुसारच ठरेल.
दामू म्हणाले, की मगो पक्षाने आमच्या ताब्यातील मतदारसंघात लुडबूड करू नये, त्यांनीही युतीचा धर्म पाळावा एवढेच अपेक्षित आहे. बाकी दीपक ढवळीकर आज आपल्याला भेटल्यानंतर आम्ही चांगल्या प्रकारेच चर्चा केली. पुढील प्रवासाविषयी चर्चा झाली. मगोच्या केंद्रीय समितीची आजच अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बैठक घेतली. भाजपसोबत युती कायम ठेवावी, असा निर्णय झाला असल्याचे ढवळीकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
हिंदू मतांचे विभाजन होऊ नये हा हेतू आहे. केंद्रीय समिती बैठकीला नारायण सावंत, रत्नकांत म्हार्दोळकर, राघोबा गावडे, दामू दिवकर, प्रताप फडते, नरेश गावडे, शिवदास गावडे, सुदीप कोरगावकर आदी उपस्थित होते.
जीतकडे पेडणेची जबाबदारी
दीपक ढवळीकर म्हणाले की, आमदार जीत आरोलकर यांच्याकडे आम्ही पूर्ण पेडणे तालुक्याची जबाबदारी द्यायची, असे ठरवले आहे. पेडणे तालुक्यात मगो पक्ष अधिक मजबूत करणे, मगोपचे काम तिथे वाढविणे ह्या गोष्टी जीतकडून अपेक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.