“कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 15:32 IST2023-02-26T15:31:02+5:302023-02-26T15:32:11+5:30
आरजीने काढलेली रॅली अडवणे हे लोकशाही विरोधी कार्य आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल”
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार असून भाजपाला अधिक जागा मिळविण्यासाठी कर्नाटकाला खूश करण्यासाठीच केंद्र सरकारने गोव्याची जीवनदायिनी असलेली म्हादई कर्नाटकाला विकली. अशा हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल, असे मत प्रशांत नाईक यांनी व्यक्त केले. 'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा'ची सोमवारी काणकोणात जाहीर सभा होणार असल्याचेही ते म्हणाले. राजबाग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आरजीने काढलेली रॅली अडवणे हे लोकशाही विरोधी कार्य आहे. यावेळी विकास भगत, जनार्दन भंडारी, संदेश तेलेकर, जॅक फ़र्नांडिस, उमेश तुबकी गास्पार कुतिन्हो उपस्थित होते. सुर्ला नदीचे पाणी साळावली धरणाला मिळत आहे. उद्या ही नदी बंद झाल्यावर साळावलीवासीयांनाही याची झळ बसणार आहे. हा विषय उत्तर गोव्याचा, आम्हांला दक्षिण गोवावासीयांना का लागतो? असा विचार करून चालणार नाही.
म्हादईचा विषय हा संपूर्ण गोवेकरांचा असून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या आंदोलनात, या लढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन विकास भगत, जनार्दन भंडारी व संदेश तेलेकर यानी केले. सोमवारी ४ वाजता चावडी काणकोण येथील जुन्या बसस्थानकावर होणाऱ्या जाहीर सभेत पर्यावरण तज्ज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, फादर बलमेक्स परेरा, आमदार विजय सरदेसाई मार्गदर्शन करणार असल्याचे भगत यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"