भाजप-मगो युतीला मिळाली ४३ टक्के मते; जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मोठी कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:54 IST2025-12-24T10:54:41+5:302025-12-24T10:54:52+5:30
या निवडणुकीत नऊ मतदारसंघांच्या एकत्रित मतवाट्याचा आढावा घेतल्यास एकट्या भाजपला सर्वाधिक ४०.०१ टक्के मिळवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजप-मगो युतीला मिळाली ४३ टक्के मते; जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मोठी कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजप मगो युतीला ४३.७० टक्के मते प्राप्त झाली आहेत. २०२०च्या जि. पं. निवडणुकीच्या तुलनेत ती २.७ टक्क्यांनी जास्त आहेत. २०२०मध्ये भाजपने ४६ जागा लढवल्या होत्या. आता मगोशी युती करून ४३ जागा लढवल्या. 'आमचे विजयी उमेदवार पाहता स्ट्रायकिंग रेट ८० टक्के आहे', असा दावाही भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे.
या निवडणुकीत नऊ मतदारसंघांच्या एकत्रित मतवाट्याचा आढावा घेतल्यास एकट्या भाजपला सर्वाधिक ४०.०१ टक्के मिळवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोरजी, धारगळ, कारापूर सर्वण, मये, राय, शिरोडा, रिवण, पैंगीण आणि खोर्ली या मतदारसंघांचा समावेश या विश्लेषणात करण्यात आला आहे.
दरम्यान, एकूणच या नऊ मतदारसंघांमध्ये भाजपने सर्वाधिक मतवाट्यासह वर्चस्व राखले असून, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष उमेदवारांची उपस्थितीही राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची ठरल्याचे दिसून आले आहे. कारापूर सर्वण मतदारसंघात भाजप उमेदवाराला बऱ्यापैकी मते मिळाली. याचे कारण या मतदारसंघातील कुडणे पंचायत क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात येते. मुख्यमंत्र्यांनी तेथे विशेष लक्ष दिले होते.
दरम्यान, भाजपची मते वाढण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात तसेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार दिव्या राणे यांच्या वाळपई व पर्ये मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात भाजपला मताधिक्य मिळाले आहे. सत्तरीत मोठी आघाडी घेऊन भाजप उमेदवार विजयी ठरले आहेत. केरी मतदारसंघात विजयी उमेदवाराने सर्वाधिक १२,००० मतांची आघाडी घेतली. होंडा, नगरगांवमध्ये भाजप उमेदवारांनी लक्षणीय मते प्राप्त केली आहेत.
नऊ मतदारसंघातील आकडेवारीनुसार भाजपला एकूण ४७,२०८ मते मिळाली आहेत. गोवा फॉरवर्डला २६,८५० म्हणजेच २२.८ टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीत अपक्ष व बंडखोर उमेदवारांनीही लक्षणीय कामगिरी केली असून, त्यांना या नऊ मतदारसंघांमध्ये १६,०६२ मते मिळाली आहेत. त्यांचा एकूण मतवाटा १३.७टक्के इतका आहे.