मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:51 IST2025-12-11T09:50:54+5:302025-12-11T09:51:06+5:30
Goa Night Club Fire : २५ जणांचा बळी घेणाऱ्या गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई; लुथरा बंधूंचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता

मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित
गोव्यातील अरपोरा येथे 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर प्रशासन अत्यंत कठोर कारवाई करत आहे. या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांच्यावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे.
लुथरा बंधूंवर मोठी कारवाई
गोवा पोलिसांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने तत्काळ पाऊल उचलत लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे लुथरा बंधूंना आता कोणत्याही देशात प्रवास करणे शक्य होणार नाही. गोवा सरकारने परराष्ट्र मंत्रालयाला त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याबाबत पत्र पाठवले आहे. भारतीय पासपोर्ट कायद्यानुसार आवश्यक तपासणी करून लवकरच त्यांचे पासपोर्ट रद्द केले जाण्याची शक्यता आहे.
हा पळून जाण्याचा प्रयत्न?
तपासात उघड झाले आहे की, क्लबला आग लागल्यानंतर लगेचच (७ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजता) क्लब मालकांनी फुकेत, थायलंडला जाण्यासाठी विमानाची तिकिटे बुक केली होती.
क्लब मालक की केवळ परवानाधारक?
बुधवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने लुथरा बंधूंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. न्यायालयात त्यांच्या वकिलांनी पळून जाण्याचा आरोप फेटाळून लावला आणि हा प्रवास केवळ व्यावसायिक बैठकीसाठी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, वकिलांनी असाही युक्तिवाद केला की हे दोघे भाऊ नाईट क्लबचे खरे मालक नसून, केवळ परवानाधारक होते.
आतापर्यंत ६ आरोपींना अटक
या गंभीर दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये अजय गुप्ता (दिल्लीचा रहिवासी, क्लबमधील भागीदार), राजीव मोडक (चीफ जनरल मॅनेजर), विवेक सिंग (जनरल मॅनेजर), राजीव सिंघानिया (बार मॅनेजर), रियांशु ठाकूर (गेट मॅनेजर), भरत कोहली (कर्मचारी) यांचा समावेश आहे.
अजय गुप्ताला न्यायालयात हजर केल्यानंतर ३६ तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने क्लबवर कठोर कारवाई करत रोमियो लेनवरील क्लबची आणखी एक मालमत्ता बुलडोझरने पाडली आहे. सरकार या घटनेतील दोषींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे.