समुद्रकिनारे दिव्यांग सुलभ बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:20 IST2025-10-10T07:19:19+5:302025-10-10T07:20:01+5:30
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५चे उद्घाटन; दिव्यांग खाते निर्माण करणारे गोवा हे देशात एकमेव राज्य

समुद्रकिनारे दिव्यांग सुलभ बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळे खाते असलेले गोवा हे एकमेव राज्य आहे. राज्य सरकार दिव्यांगांसाठी विविध योजना, सवलती राबवित आहे. आता सार्वजनिक इमारती दिव्यांगांसाठी सुलभआगामी काळात समुद्रकिनारे, केल्या जातील,' अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. राज्य दिव्यांग आयोग व दिव्यांगजन खात्यातर्फे गुरुवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यापुढेही दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातील, असे ते म्हणाले.
पर्पल फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद तानावडे व दिव्यांग राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दाजी साळकर यांसह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केंद्रात दिव्यांगजनांसाठी विविध योजना सुरू केल्या. देशभरातील कोट्यवधी दिव्यांगांपर्यंत या सुविधा पोहोचत आहेत. यासाठी पंतप्रधान दिव्यांगजन केंद्र सुरू करण्यात आले. त्यांचे दिव्यांगांना सर्व सहकार्य मिळत आहे.
राज्यात गेल्या काही वर्षापासून दिव्यांग लोकांसाठी पर्पल फेस्टचे यशस्वीरीत्या आयोजन केले जात आहे. यात देश-विदेशातील लोक सहभागी होत आहेत. या महोत्सवामुळे दिव्यांगांना मोठे व्यासपीठ मिळत आहे.
दिव्यांगांची कला जगभर
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यातील दिव्यांग लोकांना विविध सवलती मिळाव्यात, त्यांच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही स्वतंत्र खाते तयार केले. यामार्फत त्यांना सर्व योजना, सवलती दिल्या जातात. दिव्यांगांची खास काळजी घेणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. राज्यातील अनेक सरकारी कार्यालये दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीस्कर केली आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्या राखीव आहेत. दिव्यांग व्यक्तींना अनेक उपकरणे सरकारतर्फे मोफत दिली जातात. आता महोत्सवाच्या माध्यमातून दिव्यांगजन आपली कला जगभर पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. हे दिव्यांगांसाठी खास व्यासपीठ ठरले आहे.
मनोरंजनाचे कार्यक्रम आकर्षण
पर्पल फेस्टच्या उद्घाटनाला देश-विदेशांतून आलेल्या दिव्यांग लोकांनी उद्घाटनावेळी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर केले. या महोत्सवाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आयुष्मान कार्डचे वितरण
महोत्सवासाठी उपस्थित केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी पणजीतील सम्राट अशोक थिएटर संकुलातील झेड स्क्वेअर हॉलमध्ये पीपीई सुरक्षा साहित्याचे आणि आयुष्मान कार्डाचे वितरण केले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्तनिमित्त आरोग्य संचालनालय कांपाल ते पणजी मार्केट हा आयनॉक्सच्या मागील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत हा रस्ता बंद राहील, असे सांगण्यात आले.