सचिन कोरडे
पी. सिंधू, सायना नेहवाल या महिला खेळाडूंच्या जागतिक यशामुळे भारतीय बॅडमिंटन संघटनेचा स्तर अधिकच उंचावला. आता या संघटनेची निवडणूकही ‘हायप्रोफाईल’ बनली आहे आणि म्हणूनच की काय, ती जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या गोव्यात घेण्याचे ठरविण्यात आले. येत्या 3 एप्रिल रोजी भारतीय बॅडमिंटन संघटनेची (बीआयए) आमसभा आणि त्याच दिवशी निवडणूकही होईल. निवडणुकीसाठी कळंगुट येथील एक पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने विविध राज्यातील सदस्य गोव्यात दाखल होतील. अंतरिम अध्यक्ष असलेले आसामचे भाजप नेते हिमांता बिसवा शर्मा यांचे नाव अध्यक्षपदासाठी कायम असून त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हिमांता हे सध्या आसाम बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षही आहेत. दीड वर्षांपूर्वी माजी अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांच्या निधनानंतर त्यांनी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सूत्रे स्वीकारली होती. महासचिवपदासाठी मात्र दोन नामांकन आली आहेत. त्यात हरयाणाचे अजय कुमार सिंघानिया आणि राजस्थानचे अजय कुमार शर्मा यांचा समावेश आहे. या निवडणुकीत ३२ राज्यांतील सदस्य सहभागी होतील. प्रत्येक राज्याला प्रत्येकी दोन असे मतदानाचे अधिकार असतील. गोव्यातर्फे गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षनरहर ठाकूर आणि सचिव संदिप हेबळे हे मतदान करतील. नरहर ठाकूर यांनी‘बाय’ च्या संयुक्त सचिव या पदासाठी नामांकन अर्र्ज केलेला आहे. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य मुखन्यायाधीश (निवृत्त) डॉ. आफताफ हुसेन सैकिरा हे निवडणुकीचे ‘रिर्टनिंग आॅफिसर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. नवी कार्यकारिणी २०१८ ते २०२२ पर्यत अशी असेल. दरम्यान, या निवडणुकीसाठी विविध राज्यातील बॅडमिंटन क्षेत्रातील मान्यवर गोव्यात येणार आहेत. त्यात पुलेला गोपीचंद यांचाही समावेश आहे.