बाबूश बोलतात, म्हणून निर्णय घेणारा मी नव्हे : उत्पल पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:05 IST2026-03-17T11:05:13+5:302026-03-17T11:05:13+5:30
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या ऑफरवरून राजकीय वर्तुळात चर्चा

बाबूश बोलतात, म्हणून निर्णय घेणारा मी नव्हे : उत्पल पर्रीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आपण भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याचे स्वागतच केले जाईल, असे विधान मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नुकतेच केले असले तरी त्या विधानामागील त्यांचा नेमका हेतू काय आहे हे मला ठाऊक नाही. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याचा मी फारसा विचार करत नाही, असे स्पष्ट मत उत्पल पर्रीकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
पणजी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दिलेल्या एका मुलाखतीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांनी भाजपमध्ये यावे, ते आले तर आपल्याला कुठलाही आक्षेप नसून उलट त्यांचे स्वागतच केले जाईल, असे विधान केले होते. या विधानानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर उत्पल पर्रीकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.
उत्पल पर्रीकर म्हणाले की, बाबूश बोलतात म्हणून मी माझे राजकीय निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी माझ्या भाजप प्रवेशाबाबत असे वक्तव्य का केले? त्यामागील त्यांचा हेतू नेमका काय आहे हे मला समजलेले नाही. त्यामुळे त्या विषयावर मी जास्त विचार करत नाही.
काही महिन्यांपूर्वी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजीचे आमदार म्हणून माझे वडील आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या कामकाजावर टीका केली होती.
शहराच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आता अचानक तेच बाबूश माझ्या वडिलांची प्रशंसा करताना दिसत आहेत.
हा अचानक झालेला बदल कसा झाला, असा प्रश्न मला पडला आहे, असेही उत्पल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाबूश मोन्सेरात यांनी माझ्या भाजप प्रवेशाबाबत केलेल्या वक्तव्यावर आधारित कोणताही निर्णय मी घेऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा मी जास्त विचार करत नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
भाजपच्या तत्त्वांची आठवण
बाबूश मोन्सेरात हे त्यांच्या मुलगा रोहित मोन्सेरात यालाही आमदार बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते भाजपकडून तिकीट मागणार की अन्य कोणत्या पक्षाकडून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र वडील आणि मुलाला एकाचवेळी विधानसभा निवडणुकीत तिकीट देणे हे भाजपच्या तत्त्वांमध्ये बसत नाही, हे सर्वांना ठाऊक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय चर्चांना उधाण
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिलेल्या मुलाखतीत उत्पल पर्रीकर यांनी भाजपमध्ये यावे, असे वक्तव्य केल्यानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाना जोर आला आहे. विशेषतः पणजी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर हे विधान आल्यामुळे त्याला अधिक राजकीय अर्थ दिला जात आहे.
भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याबाबत उत्पल पर्रीकर यांची भूमिका काय असेल, तसेच भविष्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होईल, याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा रंगू लागली आहे.