मुख्यमंत्रिपद मिळत होते; पण त्यांनी मगो विलीन केला नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:31 IST2025-04-10T12:29:38+5:302025-04-10T12:31:17+5:30
अर्थात ही माहिती माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या तोंडून बाहेर आली व सर्वांना कळाली.

मुख्यमंत्रिपद मिळत होते; पण त्यांनी मगो विलीन केला नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: स्वर्गीय मनोहर पर्रीकर ज्यावेळी आजारी होते, त्यावेळी म्हणजेच काही वर्षांपूर्वी मगो पक्ष विलीन करा व मुख्यमंत्री व्हा, असा प्रस्ताव सुदिन ढवळीकर यांना दिला गेला होता; पण ढवळीकर यांनी त्यावेळी मगो पक्ष विलीन करायला नकार दिला होता. मगोप त्यानंतर फुटला. अर्थात ही माहिती काल माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या तोंडून बाहेर आली व सर्वांना कळाली.
आताचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे पर्रीकर मंत्रिमंडळातही मंत्री होते. सुदिननी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करावा, अशी चर्चा झाली होती. भाजपकडून तसा प्रस्ताव दिला गेला होता. सुदिननी जर मगो पक्ष त्यावेळी भाजपमध्ये विलीन केला असता तर सुदिन मुख्यमंत्री झाले असते. आपण स्वतः त्यांना मगो विलीन करून मुख्यमंत्री व्हा, असे सांगितले होते; पण ते ऐकले नाहीत. आम्हाला तसा प्रस्ताव आला होता, म्हणून मी तसे सुदिनला सांगितले होते; पण ढवळीकरांनी ते ऐकले नाही. त्यानंतर मी भाजपमध्ये गेलो व उपमुख्यमंत्री झालो.
बाबू आजगावकर म्हणाले की, सुदिन ढवळीकर हे मगो पक्ष सांभाळत आहेत व अजूनही गोव्यातील लोकांना मगोविषयी प्रेम आहे. कारण, बहुजन समाजाचा हा पक्ष भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केला होता. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते गोव्याच्या कानाकोपऱ्यात आहेत. ढवळीकरांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर न स्वीकारता मगोला महत्त्व दिल्याचे आजगावकर यांनी सांगितले.
बाबू तिकिटासाठी भेटले होते
दरम्यान, भाजपमध्ये गेल्यानंतरही जेव्हा २०२२च्या निवडणुकीवेळी भाजपने बाबू आजगावकर यांना पेडण्यात तिकीट नाकारले तेव्हा बाबूंवर अन्याय झाला, असे पेडणेचे कार्यकर्ते बोलले होते. आजगावकर त्यावेळी चर्चिल आलेमाव यांना घेऊन पुन्हा सुदिन ढवळीकर यांच्या बांदिवडे येथील घरी गेले होते. आपण पुन्हा मगो पक्षात येतो, आपल्याला मगोचे तिकीट द्या, असे सुदिनना आजगावकर यांनी सांगितले होते. चर्चिल त्यावेळी तृणमूल काँग्रेसमध्ये होते. सुदिननी आता पुन्हा मगोचे तिकीट तुम्हाला देणार नाही, असे बाबूंना सांगत २०२२ साली नकार दिला होता. बाबू आजगावकर यांनी मगो पक्ष सोडला नसता तर कदाचित पेडण्यातून ते पुन्हा २०२२ मध्ये निवडून आले असते. काल मंत्री ढवळीकर यांना मीडियाने विचारले असता मगोचा हात सोडल्याने आजगावकर हे राजकारणात मागे पडले असे ढवळीकर म्हणाले.