'आरजी'कडून कोळसा विरोधात जागृती मोहीम: आमदार वीरेश बोरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:44 IST2025-09-03T07:43:17+5:302025-09-03T07:44:05+5:30
रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा, स्टील यांची वाहतूक होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

'आरजी'कडून कोळसा विरोधात जागृती मोहीम: आमदार वीरेश बोरकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूकप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री व भाजप आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी रेव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे आमदार पत्रकार परिषदेत केली.
वीरेश बोरकर यांनी कोळसा वाहतुकीला आम्ही पाठिंबा देत नाही, असे विधान भाजप सरकारने केले होते. मात्र, सध्याच्या स्थितीत सरकारच कोळसा वाहतुकीला चालना देत असल्याचे चित्र आहे. रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा, स्टील यांची वाहतूक होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
बोरकर म्हणाले की, रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प हा भगवान महावीर अभयारण्य तसेच दाट रान वाटातून जाणार आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी होणार आहे. कोळसा वाहतूक नको, असे विधान दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही केले होते. मात्र, आता त्यांनी तसे विधान केलेच नव्हते, असे 'भाजप'चे आमदार सांगत आहेत. चांदोर येथे या प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षात असताना आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भाग घेतला होता. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मौन बाळगल्याची टीकाही त्यांनी केली.
गोव्यासारख्या पर्यटक राज्यात रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूक प्रकल्प नको. एका बाजूने मुख्यमंत्री 'भिवपाची गरज ना' असे विधान करतात. तर दुसरीकडे मात्र कोळसा प्रश्न जनतेवर खऱ्या अर्थाने 'भिवपाची' वेळ आली आहे. रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतूकप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बोरकर म्हणाले.