रामाला का 'वनवास'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:36 IST2025-10-14T07:34:54+5:302025-10-14T07:36:03+5:30
रामा काणकोणकर हा तरुण असाच धाडसी, हे मान्य करावे लागेल.

रामाला का 'वनवास'?
रामा काणकोणकर म्हणजे राजेंद्र केरकर नव्हे किंवा रामा काणकोणकर म्हणजे क्लॉड आल्वारीसदेखील नव्हे. रामा म्हणजे सुदीप ताम्हणकरही नव्हे आणि रामा म्हणजे रमेश गावस किंवा अभिजित प्रभुदेसाईही नव्हे. ही जी नावे आम्ही इथे नमूद केली, ती सगळी सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत. विविध स्तरांवर काम करणारे हे कार्यकर्ते. कुणी पर्यावरण रक्षणासाठी लढतो, कुणी म्हादईप्रश्नी आवाज उठवतो, कुणी बेकायदा मायनिंगविरोधात रण पेटवतो, तर कुणी आरटीआयचा वापर करून सरकारी गैरकारभार उघड करतो. यातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता हा वेगळ्या स्वभावगुणांचा आणि प्रवृत्तीचा आहे. प्रत्येकाची स्टाइल, वागण्याची पद्धत समान असत नाही. काहीजण राकट, रांगडी भाषा वापरून विषयाला थोडा राजकीय रंगही देतात. मात्र ते धाडसी असतात म्हणून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढतात.
रामा काणकोणकर हा तरुण असाच धाडसी, हे मान्य करावे लागेल. रामाने आता २३ दिवसांनंतर सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. त्यामुळे त्याचा बोलविता धनी कुणी तरी वेगळा आहे, असे म्हणून सरकार मोकळे होत आहे. रामाला आपल्या राजकीय विरोधकांनी फितवले किंवा फूस लावली, त्यामुळे तो आता राजकारण्यांची नावे घेतोय, असेही समाजाचा एक घटक बोलत आहे. भाजप कार्यकर्ते तर जाहीरपणे हेच सांगतात. आज काँग्रेस पक्ष सत्तेत असता तर काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप झाले असते आणि काँग्रेसवाले असेच बोलले असते. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे हा जगप्रसिद्ध नियम आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी 'संपादकीय' मध्ये रामाची वेदना मांडली होती. सत्य काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही.
एक गोष्ट खरी की, रामाने पाच-सहा महिन्यांपूर्वीच आपल्या जिवाला धोका आहे, असे जाहीर केले होते. त्याला कुणापासून धोका आहे, कोण धमक्या देतो किंवा कुणाची माणसे धमक्या देतात हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्याबाबतचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर फिरत आहे.
पोलिसांनी त्यावेळीच योग्य पावले उचलली असती तर कदाचित रामावर हल्ला झाला नसता. एसटी समाजातील एक तरुण सामाजिक कार्यकर्ता दिवसाढवळ्या काही गुंडांच्या माराला सामोरा जातोय, तेव्हा त्याचा दोष असो-नसो, त्याची वेदना समजून घेण्याची गरज आहे. व्यक्तिगत आकसापोटी रामावर हल्ला झाला होता का, हेही पोलिसांनी शोधून काढावेच. रामाच्या मागे आता कुणी बोलविता धनी आहे काय याचाही शोध घ्यावा आणि रामा म्हणतो त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांचाही संबंध त्याच्यावरील हल्ल्याशी आहे काय हेही पोलिसांनी तपासून पहावे. विरोधी आमदार जाऊन रामाला इस्पितळात सांगतील व मग रामा चक्क गृहमंत्री व पर्यटन मंत्र्यांचे नाव घेईल, असे सहसा घडत नसते. कारण चौकशी यंत्रणेने तपास केला तर आपले खोटे आरोप उघडे पडतील याची भीती शेवटी आरोप करणाऱ्यालाही असतेच.
सत्ताधाऱ्यांचा कदाचित रामावरील हल्ल्याशी संबंध नसेलदेखील, पण ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता पोलिस यंत्रणेची आहे. तुम्ही एखाद्यावर हल्ला करून या, असे मुख्यमंत्री गुंडांना सांगतील एवढी वाईट परिस्थिती अजून गोव्यात आलेली नाही. तसे पाहायला गेल्यास क्लॉड आल्वारीस यांच्या लढ्यामुळे बेकायदा खाण धंदा बंद झाला तेव्हा मोठमोठे माफिया दुखावले गेले; पण क्लॉडवर कधी हल्ला झाला नाही. २०१३ साली पर्रीकर सरकारच्या काळात क्लॉडला मोठा व्हीलन ठरविण्याचा प्रयत्न झाला होता, खाणग्रस्त भागातील आमदार त्या प्रयत्नात आघाडीवर होते, पण क्लॉड व्हीलन ठरले नाहीत. रामावरील हल्ला हा व्यक्तिगत रागातून असो किंवा अन्य कोणत्या कारणास्तव असो, पण रामादेखील खलनायक ठरणार नाही. मात्र रामाच्या आरोपाची चौकशी झाली तरच सत्य काय ते कळून येईल. आता रामाचा निषेध करणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी त्याच्यावरील हल्ल्याचा मात्र निषेध केला नव्हता. अमानुष पद्धतीने रामाला मारले गेले हे सत्य आहे.
तीन तास रामाची पोलिसांनी जबानी घेतली होती. पण रामाने पूर्वी कुणा राजकारण्याचे नाव घेतले नव्हते, असे पोलिस सांगतात. तुझा कुणा राजकारण्यावर संशय आहे काय, असा प्रश्न पोलिसांनी जबानीवेळी रामाला विचारला होता काय? रामा म्हणतो त्याप्रमाणे मॅजिस्ट्रेटसमोर जबानी नोंदविण्याची प्रक्रिया व्हायला हवी.