'एआय' तपासणीमुळे रोग निदानात अचूकता: आरोग्य मंत्री राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:28 IST2025-08-14T07:27:18+5:302025-08-14T07:28:16+5:30
उपचारही होताहेत वेळेवर, फुफ्फुसातील शोधल्या सहा हजार गाठी, वेळेवर उपचाराचा रुग्णांना झाला फायदा, वाचले प्राण

'एआय' तपासणीमुळे रोग निदानात अचूकता: आरोग्य मंत्री राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :आरोग्य क्षेत्रात 'एआय'चा वापर करताना फुफ्फुसाची कर्करोग तपासणी करणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. कर्करोग, दुर्मीळ जनुकीय आजार व ऑटोइम्युन रोगांवरील उपचार खर्च ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. हा खर्च सामान्य, दुर्लक्षित समाजघटकांना परवडत नाही. त्यासाठी सरकार एआयचा वापर करून आरोग्यसेवा बळकट करत आहे. हे नवे धोरण आरोग्य सेवेत क्रांती घडवेल' असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
क्युअर एआय आणि एस्ट्राझेनिका कंपनीच्या माध्यमातून काल झालेल्या कार्यक्रमात प्रायसिंग पॉलिसी फॉर इनोव्हेटिव्ह लाइफसेव्हिंग थेरपी लागू करण्याची घोषणा करण्यात आली.
आरोग्य क्षेत्रात एआय वापरणारे एकमेव राज्य
या कार्यक्रमाला आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा, आरोग्य संचालक डॉ. रुपा नाईक, गोमेकॉचे डीन जयप्रकाश तिवारी, क्युअर एआयचे मुख्य कार्यकारी संचालक प्रशांत वारियर व पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी करणारे गोवा हे एकमेव राज्य ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने आरोग्य क्षेत्रात ही क्रांती आणण्यात यश आले आहे. त्यामुळे राज्यातील गरीब जनतेला बाहेर लाखो रुपये खर्च करून उपचार करण्यापेक्षा राज्यातच हा उपचार करता येतो. २०२४ पासून कृत्रिम बुद्धिमत्ता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट करण्यात आली आहे.
उपचार खर्च आवाक्यात आणण्याचा प्रयत्न
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या सेवेमार्फत आतापर्यंत ७० हजारपेक्षा अधिक छातीचे एक्स रे तपासले गेले आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये सहा हजारहून अधिक फुफ्फुसातील गाठी शोधल्या. ५०० हून अधिक उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख पटली. लवकर निदानामुळे रुग्णांना त्वरित उपचार मिळून जीव वाचले, खर्च कमी झाला. याचा उद्देश गंभीर व जटिल आजारांवरील, कर्करोगासारख्या आजारांवरील, औषधे, निदान चाचण्या व उपचार रुग्णांच्या आवाक्यात आणणे हा आहे. सरकार व औषध निर्माण कंपन्यांदरम्यान गोपनीय व परिणाम-आधारित करारांद्वारे उपचार खर्च कमी होईल.
राज्यात याची सुरुवात ही फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांपासून होणार आहे. सरकारी आरोग्य बजेटवर अतिरिक्त ताण न आणता अधिक रुग्णांना उपचार मिळतील. राज्य सरकार, क्युअर एआय आणि एस्ट्राझेनिका यांच्या भागीदारीत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या तपासणी व उपचारासाठी देशातील पहिले मॉडेल ठरत आहे. त्याचा आराखडा जगभरातील आरोग्य व्यवस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. - विश्वजित राणे, आरोग्यमंत्री.