गोमॅकोच्या पीजी प्रवेशासाठी १०० टक्के आरक्षण जाहीर करा; काँग्रेस ओबीसी गटाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:31 IST2026-03-11T09:31:37+5:302026-03-11T09:31:59+5:30
मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर, अधिसूचना अद्याप नाही

गोमॅकोच्या पीजी प्रवेशासाठी १०० टक्के आरक्षण जाहीर करा; काँग्रेस ओबीसी गटाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमॅको) आणि गोवा डेंटल महाविद्यालय मधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के रोस्टर आधारित आरक्षण लागू करण्याबाबतचे नियम तातडीने जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेस ओबीसी गटाचे शरद (नितीन) चोपडेकर यांनी केली. त्यांनी याबाबतच एक निवेदनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे दिले.
चोपडेकर यांनी सांगितले की, गोमॅको मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के रोस्टर आधारित आरक्षणाबाबतचे नियम तयार करण्याचा प्रस्ताव २८ जानेवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला होता. मात्र, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही अद्याप या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जाहीर केलेली नाही. तसेच, ४ ऑगस्ट २०२५ रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री यांनी पुढील आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
गेल्या काही वर्षांपासून ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योग्य रोस्टर प्रणाली लागू नसल्यामुळे अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीजी मेडिकल प्रवेशासाठी नीट पीजी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याने, त्यापूर्वी रोस्टर आधारित आरक्षणाचे नियम जाहीर करणे अत्यावश्यक आहे.