... अन् अर्ध्या वाटेवरच मृत्यूने कवटाळले; नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतले
By पंकज शेट्ये | Updated: December 31, 2023 22:02 IST2023-12-31T22:01:50+5:302023-12-31T22:02:35+5:30
नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या तरुण पर्यटकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

... अन् अर्ध्या वाटेवरच मृत्यूने कवटाळले; नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: आपल्या मित्राबरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणारा तरुण पर्यटक प्रवास करत असलेल्या रेल्वेतून बाहेर पडून रेल्वे चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. बागलकोट, कर्नाटक येथील २५ वर्षीय कुबेर जाधव चालत्या रेल्वेच्या दरवाजावर थांबून उलट्या काढताना त्याचा तोल जाऊन बाहेर पडून रेल्वेच्या चाकाखाली आल्याने तो कापून जागीच ठार झाल्याची माहीती वास्को रेल्वे पोलीसांनी दिली.
वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक अमरनाथ पासी यांनी दिलेल्या माहीतीनुसार ३१ डीसेंबर (रविवार) च्या पहाटे ४ वाजता ती घटना घडली. बागलकोट येथे राहणारा कुबेर जाधव त्याचा मित्र निळकंठ चव्हाण याच्याबरोबर गोव्यात येण्यासाठी शनिवारी (दि.३०) रात्री हुबळी रेल्वे स्थानकावरून यशवंतपूर एक्सप्रेस रेल्वेत चढला होता. कुबेर आणि त्याचा मित्र निळकंठ गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येत होते अशी माहीती पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांनी दिली. रेल्वेत प्रवास करताना दुधसागर परिसरात पोचत असताना अचानक कुबेर यांची प्रकृती बिघडून त्याला उलट्या येत असल्याचे जाणवल्याने तो रेल्वेच्या दरवाजावर जाऊन त्याने उलट्या काढायला सुरवात केली. चालत्या रेल्वेच्या दरवाजावर उभा राहून कुबेर उलट्या काढताना अचानक दुधसागर रेल्वे स्थानकाच्या परिसरात त्याचा तोल जाऊन तो रेल्वेबाहेर पडून चाकाखाली आला. कुबेर रेल्वेखाली कापला गेल्याने जागीच ठार झाला.
गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणारा तरुण पर्यटक रेल्वेखाली येऊन मरण पोचल्याची माहीती वास्को रेल्वे पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. पोलीसांनी अपघाताचा आणि मयत कुबेर याच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. सोमवारी कुबेरच्या परिवारातील सदस्य गोव्यात पोचल्यानंतर त्याच्यावर शवचिकीत्सा करून त्याचा मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात देण्यात येईल. रेल्वेखाली येऊन मरण पोचलेला कुबेर अविवाहीत असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक अमरनाथ पासी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.