संशयकल्लोळ: दक्षिण गोव्यात विरोधकांचे एक मत फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:09 IST2025-12-31T08:08:41+5:302025-12-31T08:09:13+5:30

उत्तरेत रेश्मा बांदोडकर बिनविरोध, दक्षिण गोव्यात सिद्धार्थ गावस-देसाई

an opposition vote split in south Goa | संशयकल्लोळ: दक्षिण गोव्यात विरोधकांचे एक मत फुटले

संशयकल्लोळ: दक्षिण गोव्यात विरोधकांचे एक मत फुटले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/मडगाव : उत्तर गोव्याच्या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर यांची एकमताने निवड झाली. तर उपाध्यक्षपदी नामदेव च्यारी यांची निवड झाली. तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि. ३०) व झालेल्या निवडणुकीत भाजपचे सिद्धार्थ गावस-देसाई तर अंजली अर्जुन वेळीप हे दोघे १६ विरुद्ध ९ मतांच्या फरकाने विजयी झाले. विरोधी आघाडीकडे १० असे संख्याबळ असताना भाजपच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला १५ ऐवजी १६ मते मिळाल्याचे मतमोजणीवेळी स्पष्ट झाले. विरोधकांना ९ मते मिळाली. या फुटलेल्या एका मताची चर्चा आता सुरू झाली आहे.

काँग्रेस उमेदवार दक्षिण गोवा जिल्हा पंचायतच्या अध्यक्षपदी भाजपा उमेदवार गावस-देसाई यांना २५ पैकी १६ मते मिळाली. लुईसा रॉड्रिग्स यांना ९ मते मिळाली. मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता मतदान सुरू झाले. निवडणूक अधिकारी म्हणून दक्षिण गोवा पंचायत सहायक संचालक मान्यूएल बार्रेटो, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास कांबळे उपस्थित होते. विरोधी आघाडीकडून काँग्रेसच्या लुईझा रॉड्रिग्स, तर उपाध्यक्ष पदासाठी गोवा फॉरवर्डच्या इनासिया पिंटो यांनी अर्ज सादर केला होता.

नूतन अध्यक्ष सिद्धार्थ गावस-देसाई व उपाध्यक्ष अंजली वेळीप यांचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, माजी जि. पं. उपाध्यक्षा खुशाली वेळीप, रुपेश महात्मे, माजी जि. पं. अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, माजी सदस्य सुरेश केपेकर, केपेचे नगरसेवक प्रसाद फळदेसाई आदी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

काँग्रेस आघाडीची मते एकसंघ : युरी

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीमध्ये भाजप आघाडीकडे १५ हे सदस्यीय संख्याबळ असताना भाजपला १६ मते कशी मिळाली हा चर्चेचा विषय बनला आहे. या विषयी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना विचारले असता त्यांनी कांग्रेस आघाडीची मते फुटली नसल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीची ९ मते एकसंघ असल्याचे ते म्हणाले.

आप-काँग्रेसचे आरोप

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आम आदमी पक्षाचे कोलवा जि. पं. सदस्य आंतोनियो फर्नाडिस यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप केला. निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत आप नव्हता. त्यामुळे भाजपाची बी टीम कोण? हे आता स्पष्ट झाले आहे. तर वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी, आम्ही कधीच भाजपसोबत नव्हतो. आम्ही भाजपविरोधीच आहोत. आपच्या सदस्याने भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले हा काँग्रेस पक्षाचा आरोप धादांत खोटा आहे. काँग्रेस पक्षाने केलेला आरोप बिनबुडाचे आहेत असे सांगितले. तर

माझी बदनामी : वेळीप

दरम्यान, मतदानानंतर काँग्रेसचे सदस्य संजय वेळीप हे लगेच बाहेर गेले. काहींनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला. परंतु वेळीप यांनी आपल्या घराशेजारील व्यक्तीचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारास जावे लागले असे सांगितले. आपले नाव उगाच बदनाम केले जात आहे असे ते म्हणाले.

आपकडून आरोप

दरम्यान, आप गोवाचे कार्यवाहक अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनी द्विट करत काँग्रेसवर टीका केली. गिरदोलीच्या काँग्रेस सदस्याने क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप त्यांनी केला.
 

Web Title : दक्षिण गोवा जिला पंचायत: विपक्ष में फूट से हंगामा

Web Summary : दक्षिण गोवा जिला पंचायत चुनाव में विपक्ष में फूट से भाजपा जीती। सत्तारूढ़ दल को विपक्ष के 9 वोटों के मुकाबले 16 वोट मिले। कांग्रेस और आप ने क्रॉस-वोटिंग के आरोप लगाए, जिससे राजनीतिक ड्रामा बढ़ गया।

Web Title : South Goa Zilla Panchayat: Opposition Vote Split Causes Uproar

Web Summary : BJP won South Goa Zilla Parishad election as opposition vote split. The ruling party secured 16 votes against opposition's 9. Congress and AAP trade allegations of cross-voting, fueling political drama.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.