शास्त्रशुद्ध आणि प्रेमभाव वृद्धिंगत करणारी पर्यावरणपूरक मकर संक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:53 IST2026-01-14T08:53:38+5:302026-01-14T08:53:38+5:30
महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक 'मकर संक्रांत' म्हणतात.

शास्त्रशुद्ध आणि प्रेमभाव वृद्धिंगत करणारी पर्यावरणपूरक मकर संक्रांत
संकलक : तुळशीदास गांजेकर
हिंदू धर्मात विविध उत्सवांच्या माध्यमातून केवळ धार्मिकताच दर्शविली जात नाही, तर प्रत्येक उत्सव, सण आणि व्रत मनुष्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेतात. त्यातीलच एक म्हणजे मकर संक्रांत. हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व 'थई पोंगल' नावाने ओळखले जाते. सिंधी लोक याला 'तिरमौरी' म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक 'मकर संक्रांत' म्हणतात.
गुजरातमध्ये हे पर्व 'उत्तरायण' नावाने ओळखले जाते. मकर संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण 'तिळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणून हेवेदावे विसरून मनाने जवळ येतात. सध्या मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचितप्रसंगी संक्रांत एक दिवस जाते.
हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या
दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन म्हणतात. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.
मकर संक्रांती दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला 'दक्षिणायन' म्हणतात.
मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. यावेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या काळात दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. मकर संक्रांत ते रथ सप्तमी दरम्यान हळदीकुंकू समारंभ करतात. सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच ती पूजा असते. 'नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे असे शास्त्र सांगते. महिला हळदी कुंकू करून जे दान देतात त्याला 'वाण देणे' म्हणतात. वाणात देण्यात येणाऱ्या वस्तू सात्त्विक असाव्यात.
मकर संक्रांतीच्या सणाला 'सुगडाचे' वाण देतात. सुगड म्हणजे मातीचा छोटा घट. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लातून दोरा गुंडाळतात. त्यात गाजर, बोरे, उसाची पेरे, वाटाणा आणि वालाच्या शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ, हळदी कुंकू इत्यादी घालून पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढतात, त्या पाटावर पाच सुगडे ठेवून त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना, एक तुळशीला आणि एक स्वतःसाठी ठेवतात. या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे. तसेच तिळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. बाळाच्या जन्मानंतरच्या प्रथम मकर संक्रांती बोरन्हाण करतात. बाळाला हलव्याचे दागिने घालतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढचा उन्हाळा बाधत नाही, असे समजतात.