अमित पालेकर, श्रीकृष्ण परब यांची 'आप'ला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:45 IST2026-01-06T14:44:51+5:302026-01-06T14:45:36+5:30
पक्ष सोडण्याचा निर्णय रागात नव्हे तर स्वाभिमान जपण्यासाठी : पालेकर

अमित पालेकर, श्रीकृष्ण परब यांची 'आप'ला सोडचिठ्ठी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण परब यांच्यासह अन्य काही सदस्यांनी काल, सोमवारी पक्षाला रामराम ठोकला आहे. मी घेतलेला निर्णय हा रागात किंवा घाई-घाईने घेतला नसून स्वाभिमान आणि स्पष्टता दर्शविण्यासाठी घेतल्याचे पालेकरांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'ला मोठा फटका बसला. त्यानंतर पक्षाने पालेकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले होते. काल पालेकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्ष सोडत असल्याचे पत्र अॅड. पालेकरांनी राष्ट्रीय नेते अरविंद पालेकर व गोवा प्रभारी आतिशी मार्लेना यांना पाठवले आहे.
आपण राजकारणात कुठल्याही पदाच्या आशेने आलो नव्हतो. आम आदमी पक्षात प्रवेश करताना राजकारणात पारदर्शकता आणणे, लोकशाहीचा मान ठेवणे तसेच तळागळात काम करणाऱ्या लोकांना सन्मान देणे हा होता. मात्र जसा वेळ जात होता तसे ज्या प्रकारे निर्णय घेतले जात होते त्यानुसार काम करणे कठीण बनत होते. संवाद आणि निर्णय मर्यादित होत होते. केवळ वरून निर्णय घेतले जात होते जे लोकशाहीच्या कार्याप्रमाणे नव्हते, असे अॅड. पालेकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
आपने आपल्याला व्यासपीठ दिले, त्यासाठी आपण नेहमीच आभारी राहणार. माझ्या या प्रवासात बरेच काही शिकण्यास मिळाले व मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. सांताक्रुझ मतदारसंघातील लोक तसेच कार्यकर्त्यांचा विचार करूनच आपण आप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपले लोकसेवेचे काम सुरूच राहील, असेही पालेकरांनी स्पष्ट केले आहे.
माझ्याकडे सर्व पर्याय खुले
आप पक्ष सोडणे हा अंत नसून ही नवी सुरुवात आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले म्हणून आपल्याला राग नसून ज्या पद्धतीने हटविले ते योग्य नव्हते. ज्या पक्षात चार वर्षे घालवली, त्याविषयी वाईट बोलणार नाही. आपण काँग्रेसमध्ये जाणार असल्याची सध्यातरी अफवा आहे. माझ्याकडे अनेक पर्याय खुले आहेत. मात्र कार्यकर्ते, लोक जे मला सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेणार, असल्याचेही अॅड. पालेकर यांनी स्पष्ट केले.