American female tourist burglarized; Cash and mobile escaped, crime registered | अमेरिकन महिला पर्यटकाला चोरट्याचा दणका; रोकड व मोबाईल पळविला, अज्ञातावर गुन्हा नोंद
अमेरिकन महिला पर्यटकाला चोरट्याचा दणका; रोकड व मोबाईल पळविला, अज्ञातावर गुन्हा नोंद

मडगाव: गोव्यातील किनारपटटीभागात एका गेस्ट हाउसमध्ये राहणाऱ्या एका त्रेसष्ठ वर्षीय अमेरिकन महिला पर्यटकाला अज्ञात चोरटयाने दणका देताना तिच्याकडील अमेरिकन डॉलर्स व एक मोबाईल चोरुन नेला. दक्षिण गोव्यातील माजोर्डा येथे एका गेस्ट हाउसमध्ये ही महिला पर्यटक आपल्या एका भारतीय मित्रासमवेत रहात होती. पल्सी जीन ब्लार्ड असे तक्रारदाराचे नाव आहे. कोलवा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३८0 कलमाखाली हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेलिटो फर्नांडीस हे पुढील तपास करीत आहेत.

४ नोव्हेंबर रोजी सकाळी चोरीची ही घटना घडली. तक्रारदारासोबत असलेला इसम हा मूळ गुजरात येथील असून, सोशल मिडियावरुन त्या दोघांची ओळख झाली होती अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली. सकाळी ती आंघोळीला गेली होती तर तिचा मित्र काही कामानिमित्त बाहेर गेला होता. मागाहून तक्रारदाराला आपल्या पर्समधील रोकड तसेच मोबाईल संच चोरीला गेल्याचे आढळून आले. तिच्या मित्राच्या पाकीटमधीलही रोकड लंपास झाले होती. अंदाजे पाच हजार अमेरिकन डॉलर्स अज्ञात चोरटयाने लंपास केल्याचे तपासात पोलिसांना आढळून आले आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन फर्नांडीस यांनी दिली.

Web Title: American female tourist burglarized; Cash and mobile escaped, crime registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.