फुटिरांना सोबत घेऊन युती अशक्य!; काँग्रेस नेत्यांनी मित्र पक्षांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:02 IST2025-11-23T13:00:32+5:302025-11-23T13:02:23+5:30
फुटिरांना सोबत घेऊन युती होऊ शकत नाही हे मित्रपक्षांनीही लक्षात घ्यावे, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

फुटिरांना सोबत घेऊन युती अशक्य!; काँग्रेस नेत्यांनी मित्र पक्षांना सुनावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/मडगाव: जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुकीत विरोधकांची युती व्हावी या विचारांचा मीही आहे. परंतु, फुटिरांना सोबत घेऊन युती होऊ शकत नाही हे मित्रपक्षांनीही लक्षात घ्यावे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले आहे.
खोर्ली-पैंगीण व मांद्रे मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्याच्या गोवा फॉरवर्डच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे युरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युरी म्हणाले की, विरोधकांची युती व्हावी ही इच्छा केवळ आपल्यासह विरोधी पक्षांचीच नव्हे तर गोव्यातील जनतेची आहे. परंतु, त्यासाठी काही तत्त्वांचेही पालन व्हावे. अनेक मतदारसंघात अगोदर आपले उमेदवार जाहीर करून नंतर युतीची भाषा बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यातही काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून फुटून गेलेल्यांना सहकारी विरोधी पक्षांनी स्वीकारणे हे युतीधर्मात बसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
गोवा फॉरवर्डने काँग्रेसमधून फुटून गेलेल्या इजिदोर फर्नाडिस यांना पक्षात घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये बरीच नाराजी आहे. दरम्यन, फुटिरांना काँग्रेस कधीच माफ करणार नाही. या गद्दारांना काँग्रेसच्या मित्र पक्षांनीही घेऊ नये. त्यांना गोव्यातील लोकच अद्दल घडविण्याच्या तयारीत असताना मित्र पक्षांनी या लोकभावनेचा आदर राखावा, असेही युरी आलेमाव म्हणाले.
लोकसभेवेळी काँग्रेसशी आघाडी करून लढलेल्या गोवा फॉरवर्डने झेडपीसाठी अनेक मतदारसंघात आपले उमेदवार निश्चित केले आहेत. आम आदमी पक्षाने दोन याद्याही जाहीर केल्या आहेत. यावर युरी म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवारही सज्ज आहेत. परंतु, युतीसाठी चर्चा सुरू असताना उमेदवारी याद्या जाहीर करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेले नाहीत, असेही युरी म्हणाले.
युती टिकावीच : सरदेसाई
जिल्हा पंचायत निवडणूक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढवावी, अशी चर्चा केवळ माध्यमांसमोरच सुरू आहे. प्रत्यक्ष या विषयावर एकही बैठक झाली नाही. त्यामुळे सद्यःस्थिती पाहता झेडपी निवडणुकीला फार कमी वेळ राहिला असल्यानेच आपण गोवा फॉरवर्डचे उमेदवार जाहीर करत असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. सरकारच्या धोरणांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे ही केवळ विविध पक्षातील नेत्यांचीच नव्हे तर जनतेचीही इच्छा आहे. मात्र, सध्या विरोधी नेत्यांमध्ये वेळकाढू धोरण सुरू असल्याने आपण पक्षाच्या कामाला लागल्याचे सरदेसाई म्हणाले.
काही मुद्यांवर चर्चा गरजेची : अमित पाटकर
विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी काँग्रेसचीही इच्छा आहे. मात्र, पक्षांतर केलेले नेते व इतर काही मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच समविचारी पक्षांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. काल मडगाव काँग्रेस कार्यालयात झेडपी निवडणुकीबाबत बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गिरीश चोडणकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, खासदार विरियातो फर्नांडिस उपस्थित होते.