मच्छीमारांना रोजगार संधी देणे हाच उद्देश : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:21 IST2026-01-10T12:20:22+5:302026-01-10T12:21:26+5:30
मेगा अॅक्वा फिश फेस्टिव्हलचे उद्घाटन; तीन दिवस विविध कार्यक्रम

मच्छीमारांना रोजगार संधी देणे हाच उद्देश : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील मत्स्य उत्पादन वाढविणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मच्छिमारांना रोजगार संधी देत नील क्रांती घाडवून आणणे हाच मेगा फिश फेस्टिव्हलचा मुख्य हेतू आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
कांपाल पणजी येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ९व्या अक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलचे २०२६च्या पार्श्वभूमीवर आयोजित 'मत्स्यव्यवसाय व जलकृषी' या विषयावरील राष्ट्रीय परिषद २०२६चे उद्घाटन केले. ही परिषद मत्स्य संचालनालय, यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या उद्घाटन समारंभास मत्स्यव्यवसाय मंत्री निलकंठ हळर्णकर, मत्स्य खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य (आयएएस), मत्स्य संचालक चंद्रकांत वेळीप उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, बहुप्रतिक्षित मेगा फिश फेस्टिव्हल तीन दिवस चालणार आहे.
प्रोत्साहन देणार
मत्स्यव्यवसाय आणि मासे हे राज्याच्या जीवनशैलीशी व संस्कृतीशी जवळचे असून राज्यातील कुटुंबीय परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. गोव्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मत्स्यव्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. फेस्टिव्हलच्या माध्यमातून मच्छीमार समुदायाला प्रोत्साहन मिळेल, नागरिकांना विविध जातींच्या माशांची माहिती व स्वाद अनुभवता येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
व्यवसायाला व्यासपीठ
मंत्री हळर्णकर म्हणाले, या परिषदेत मत्स्यव्यवसाय व जलकृषी क्षेत्रातील नव्या संधी, शाश्वत विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मत्स्य उत्पादनवाढ तसेच मच्छीमारांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करण्यात येत आहे. फिश फेस्टिव्हलच्या माध्यमातून राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल.