'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 07:25 IST2025-03-10T07:24:52+5:302025-03-10T07:25:49+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस 'रॅडिकल कंटेंट'चे विश्लेषण करण्यासाठी वापरत असलेल्या या साधनाने शहा प्रभावित झाले.

ai detect hateful content amit shah impressed by goa police performance | 'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोशल मीडियावरील रॅडिकल कंटेटचे विश्लेषण करण्याकरिता गोवापोलिस वापरत असलेल्या टूलचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच दिल्लीत झालेल्या बैठकीत कौतुक केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांची गोव्यात कशी अंमलबजावणी सुरू आहे, याच्या आढाव्यासाठी शहा यांनी बोलावलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक अलोक कुमार, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, आयबी प्रमुख तपन डेका, पोलिस संशोधन आणि विकास ब्युरोचे अधिकारी, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोसह गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस 'रॅडिकल कंटेंट'चे विश्लेषण करण्यासाठी वापरत असलेल्या या साधनाने शहा प्रभावित झाले. त्यांनी गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना इतरत्रही या साधनाचा वापर शक्य आहे का? हे पहा, असे सांगितले.

द्वेषपूर्ण मजकुराचा शोध

दरम्यान, या एआय टूलबद्दल प्रसार माध्यमांना अधिक माहिती देताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने असे सांगितले की, 'सोशल मीडियावर कट्टरतावादी द्वेष फैलावून अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत असतात. ऑनलाइन कट्टरतावाद आणि अतिरेकी प्रचाराचा सामना करण्यासाठी 'रॅडिकल कंटेंट- अॅनालायझर' हे एक साधन आहे. गोव्यातील बिट्स पिलानीच्या सहकार्याने ते विकसित केले गेले आहे. हे एआय संचालित टूल सोशल मीडियावरील हिंदी आणि इंग्रजी धार्मिक उपदेश स्कॅन करते. एवढेच नव्हे तर २५ मिनिटांपर्यंतच्या व्हिडिओंपर्यंतच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या सामग्रीचे विश्लेषण करू शकते.

क्विक पासनेही वेधले लक्ष

दरम्यान, गोवा पोलिसांच्या 'क्विक पास' मोबाईल अॅप्लिकेशननेही शहा यांचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा एखाद्या पर्यटकाला पोलिस चेकपोस्टवर थांबवले जाते, तेव्हा ट्रॅफिकचे अधिकारी कागदपत्र पडताळणीनंतर एक क्यूआर कोड तयार करतात. हा कोड २४ तासांसाठी वैध असतो व संबंधिताला पुढील चेकपोस्टमधून जाण्यास अनुमती देतो.

जिहाद, धर्मत्यागी, काफिरचे विश्लेषण

हे टूल 'जिहाद', 'धर्मत्यागी', 'काफिर' इत्यादी कीवर्ड ओळखून कट्टरपंथी कथांचे तसेच धार्मिक वक्तृत्वाच्या भाषण पद्धती आणि तीव्रतेचे विश्लेषण करते. हे साधन कट्टरपंथीयांचा राग आणि भीती आदी नकारात्मक भावना देखील शोधते. आतापर्यंत १५० हून अधिक रॅडिकल आणि नॉन-रॅडिकल व्हिडिओंवर चाचणी घेण्यात आली आहे.

पोलिस-बिट्स पिलानीने केले टूल विकसित

गोवा पोलिसांनी बिट्स पिलानीच्या सहयोगाने 'रॅडिकल कंटेंट-अॅनालायझर' विकसित केले आहे. पोलिसांनी आपण वापरत असलेले अॅप्स आणि टूल्सबाबत शहा यांच्यासमोर सादरीकरण केले. इतर राज्यांमध्येही पोलिसांनी हे टूल वापरावे, असा सल्ला शहा यांनी दिला.
 

Web Title: ai detect hateful content amit shah impressed by goa police performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.