आप-काँग्रेस संघर्ष तीव्र; खुल्या चर्चेचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:59 IST2025-10-06T10:59:07+5:302025-10-06T10:59:24+5:30
विरोधकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप

आप-काँग्रेस संघर्ष तीव्र; खुल्या चर्चेचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे गोवा दौऱ्यावर असताना राज्यात 'आप' आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला असून उभय पक्षांच्या स्थानिक नेत्यांमधील 'तू तू-मैं मैं' शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी खुल्या व्यासपीठावर चर्चेला येण्याचे केलेले आव्हान 'आप'चेगोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी स्वीकारले आहे.
'आप'चे गोवा प्रमुख केजरीवाल यांनी गोव्यात आल्या आल्या काँग्रेस व भाजपची युती असल्याचा आरोप केला. तसेच गेली १३ वर्षे या पक्षांनी गोवा नष्ट केल्याचा आरोप केला. यावरून काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाटकर यांनी आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेताना असे म्हटले की, उलट भाजपनेच केजरीवाल यांना मते फोडण्यासाठी गोव्यात पाठविले आहे.
आव्हान स्वीकारले, वेळ, ठिकाण सांगा...
पालेकर यांनी द्वीट करून आव्हान स्वीकारताना असे म्हटले की, 'वेळ आणि ठिकाण ठरवा, चर्चेला येण्यासाठी मी तयार आहे. मी वस्तुस्थिती सादर करीन. गोवेकरांना कळून चुकेल की कोण सत्याच्या बाजूने आहे आणि कोण विरोधकांमध्ये फूट पाडत आहे.'
ज्वलंत प्रश्न सोडून काँग्रेसवर का घसरले?
पाटकर म्हणाले की, 'मये येथील कार्यक्रमात केजरीवाल जे काही बोलले ते माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना मुळीच शोभणारे नाही. अफवांवर विश्वास ठेवून आरोप करायचे, हे योग्य नाही. मयेतील लोकांचे अनेक प्रश्न आहेत. तेथे खाण कंपनीने स्थानिकांना नोकऱ्या डावलून अन्याय केला आहे. पिळगाव, सारमानसचे शेतकरी संकटात आहेत. शिरगावचे लईराई मंदिर सरकारने खाण कंपन्यांना लिलावात दिले, या विषयांवर केजरीवाल यांना बोलता आले असते; परंतु त्यांनी कारण नसताना काँग्रेसवर निशाणा साधला.'
...तर नैतिकता कुठे गेली?
पाटकर म्हणाले की, 'आपचा गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर हे कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझ याला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करतात आणि वकिली व्यवसाय असल्याने आपण त्याची केस घेतल्याचा दावा करतात, हे काय? पालेकर यांची नैतिकता कुठे गेली? याचे उत्तरही केजरीवाल यांनी द्यावे.' केजरीवाल यांनी शालीनता व जबाबदारीने बोलावे, असा सल्लाही पाटकर यांनी दिला आहे.
नऊ खाण ब्लॉकपैकी दोनच सुरू, तरीही...
पाटकर म्हणाले की, 'माझ्या खाणी असल्याचा व सरकारशी लागेबांधे असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला तो धादांत खोटा आहे. मी खाणमालकाच्या कुटुंबात जन्मलो. केजरीवाल यांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून माझे आजोबा, पणजोबा खाण व्यवसायात आहेत. सरकारने नऊ खाण ब्लॉक लिलाव करून दिले. त्यातील दोन खाण ब्लॉकच सुरू झाले. केजरीवाल कुठल्या खाणीबद्दल बोलतात मला ठाऊक नाही.'