'आप' सर्व जागा लढणार; गोवा प्रभारी आतिशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:27 IST2025-09-01T07:26:07+5:302025-09-01T07:27:04+5:30
गणेश दर्शनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद

'आप' सर्व जागा लढणार; गोवा प्रभारी आतिशी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आम आदमी पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४० मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आणि गोवा प्रभारी आतिशी मार्लेना यांनी सांगितले. त्या सध्या गोव्याच्या भेटीवर आहेत.
प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना आतिशी म्हणाल्या की, गोव्यात सध्या आम आदमी पक्षाचे आमदारच सरकारला प्रत्येक मुद्द्यावर धारेवर धरत आहेत. भाजपने कांग्रेसचे बहुतेक सर्वच आमदार नेले आहेत. उर्वरित ३ पैकी दोन आमदारांना तोडले तर एकच राहणार आहे आणि आम आदमी पक्ष गोवा विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष ठरणार आहे. त्यामुळे आम आदमी पक्षच गोव्याचे भविष्य घडवू शकतो.
गोमंतक लोकांना या पक्षाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांना पक्ष नक्कीच पूर्ण करेल. येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व ४० जागांची लढत आम आदमी पार्टी लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक, राज्यात भाजप विरोधी पक्षांची आघाडी आहे आणि आम आदमी पक्षही त्या आघाडीचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर आतिशी यांनी ४० जागांवर लढायची घोषणा केली आहे, जी या आघाडीस धक्का देणारी आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकींविषयीही असेच विधान केले होते.
आतिशी यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की, हे सरकार भ्रष्टाचारात व्यस्त आहे. गोव्यातील लोकांना चांगले शिक्षण, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा यांची गरज आहे, पण सरकार या बाबतीत उदासीन आहे. दरम्यान, आतिषी यांनी राज्यातील पक्षाचे काही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्याच्या घरी भेट देत गणेश र्शन घेतले. तसेच यानिमित्ताने संवाद साधून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसऐवजी भाजपलाच मत द्या
राज्यातील काँग्रेसला मतदान करणे म्हणजे प्रत्यक्षात भाजपलाच मदत करणे होय. कारण काँग्रेसमधून निवडून आलेले बरेच लोकप्रतिनिधी अखेरीस भाजपमध्ये जातात. त्यामुळे काँग्रेसला मतदान करणाऱ्यांनी ते थेट भाजपलाच केलेले बरे असा टोलाही त्यांनी हाणला.