हाडाचा शेतकरी झाला झेडपी सदस्य!; ९ हजारांहून अधिक मतांनी विजयी, ऐतिहासिक विक्रम स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:29 IST2025-12-28T09:29:37+5:302025-12-28T09:29:37+5:30
एका शेतकऱ्याचा सन्मान म्हणजे संपूर्ण शेतकरी वर्गाचा गौरव आहे, अशी भावना नवनिर्वाचित जि. प. सदस्य सुंदर नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

हाडाचा शेतकरी झाला झेडपी सदस्य!; ९ हजारांहून अधिक मतांनी विजयी, ऐतिहासिक विक्रम स्थापन
विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : वडिलोपार्जित शेतीत राबणारा एक साधा शेतकरी थेट जिल्हा पंचायत सदस्य झाला. पाळी मतदारसंघासाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला आहे. भाजपचे उमेदवार सुंदर नाईक यांनी तब्बल ९ हजार २०० पेक्षा अधिक मतांनी विजय मिळवत मतदारसंघातील अनेक वर्षाचा विक्रमही मोडला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील पाळी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने एका हाडाच्या शेतकऱ्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आणि तो विश्वास जनतेने प्रचंड बहुमताने सार्थ ठरवला. सुंदर नाईक हे गेली अनेक वर्षे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून, स्व. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पक्षाशी त्यांची घट्ट नाळ राहिली आहे.
शेती व दूध उत्पादन हेच त्यांचे जीवनकार्य असून, ते आजही नावेली-मायणी येथील आपल्या शेतात स्वतः काम करताना दिसतात. पाळी मतदारसंघात अनेक ठिकाणी पडीक शेती असून, वडिलोपार्जित शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवी ऊर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. नवयुवकांनी हरित व धवलक्रांतीसाठी सामूहिक शेती व्यवसाय करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, सरकार त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास सिद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषित केलेले असून हा विषय आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून पडीक शेती ओलिताखाली आणण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सुंदर नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत गेल्या साडेसहा वर्षांपासून हरित व धवलक्रांतीचा सातत्याने पुरस्कार करीत असून, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका या निवडणुकीत ठळकपणे दिसून आली. भात, भाजीपाला, इतर पिके आणि दूध उत्पादन या सर्व क्षेत्रांत कुटुंबासोबत काम करताना सुंदर नाईक यांनी शेतीवरची आपली नाळ कधीच तुग दिली नाही.
शेतकरी वर्गाचा गौरव : सुंदर नाईक
जि. प. सदस्य बनणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण आहे. एका शेतकऱ्याचा सन्मान म्हणजे संपूर्ण शेतकरी वर्गाचा गौरव आहे, अशी भावना नवनिर्वाचित जि. प. सदस्य सुंदर नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. "स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर गोवा घडवण्यासाठी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून पुढील पाच वर्षे सामाजिक कामासोबतच हरित-धवलक्रांतीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पुढील पाच वर्षांचा निर्धार
- सामाजिक विकास
- हरित व धवलक्रांतीचा विस्तार
- पडीक शेती ओलिताखाली आणणे
- युवकांना सामूहिक शेतीकडे प्रवृत्त करणे