सागरी सुरक्षेसाठी मोठे पाऊल; तटरक्षक दलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप झाली दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:43 IST2026-01-06T10:34:46+5:302026-01-06T10:43:00+5:30
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘समुद्र प्रताप’ जहाजावर प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सागरी सुरक्षेसाठी मोठे पाऊल; तटरक्षक दलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप झाली दाखल
पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात आत्मनिर्भरता साधण्याच्या भारताच्या प्रयत्नात एक मोठे पाऊल टाकत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘समुद्र प्रताप’ हे जहाज आज गोव्यात भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट केले. गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) बांधणी करत असलेल्या दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी हे पहिले जहाज आहे.
या जहाजाच्या समावेशामुळे सागरी प्रदूषण नियंत्रण, अग्निशमन, सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासह विस्तारित देखरेख मोहिमा राबवण्याची भारताची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. याप्रसंगी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘भारतीय तटरक्षक दलाच्या बहुआयामी भूमिकेने शत्रूंना स्पष्ट संदेश दिला की, भारताच्या सागरी सीमांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल.’
प्रथमच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘समुद्र प्रताप’ जहाजावर प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला अधिकारी भावी पिढ्यांसाठी आदर्श असून, त्या राष्ट्रसेवेत योद्ध्यांच्या भूमिकेत असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्र्यांनी काढले.
हे जहाज केवळ सागरी पर्यावरणाचे रक्षण करणार नाही, तर समुद्रावर आधारित ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ टिकवून ठेवण्यासाठीही मैलाचा दगड ठरेल. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.