कला अकादमीत ५० कोटी गेले वाया; आयआयटी मद्रासच्या अहवालातून स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:08 IST2026-01-09T14:05:21+5:302026-01-09T14:08:23+5:30
या अहवालानुसार संरचनात्मक कामे अपूर्ण असणे, विविध ठिकाणी भेगा असणे, पाण्याची गळती होणे यासारख्या गंभीर त्रुटी शिल्लक आहेत.

कला अकादमीत ५० कोटी गेले वाया; आयआयटी मद्रासच्या अहवालातून स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला अकादमीतील त्रुटींबाबत अभ्यासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 'आयआयटी मद्रास'च्या अभ्यास समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार संरचनात्मक कामे अपूर्ण असणे, विविध ठिकाणी भेगा असणे, पाण्याची गळती होणे यासारख्या गंभीर त्रुटी शिल्लक आहेत.
त्यामुळे सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या कला अकादमीचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निधीचा अपव्यय झाल्याचेही स्पष्ट झाले, अशी माहिती कला अकादमी टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी दिली.
कला अकादमीच्या टास्क फोर्स समितीची बैठक गुरुवारी गोवा मनोरंजन सोसायटीमध्ये झाली. बैठकीस अध्यक्ष विजय केंकरे यांच्यासोबत टास्क फोर्सचे इतर सदस्य, कला व संस्कृती खात्याचे प्रतिनिधी, कला अकादमीचे प्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. नूतनीकरण केलेल्या कला अकादमी इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
केंकरे यांनी सांगितले की, आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञ पथकाने सप्टेंबर महिन्यात कला अकादमी इमारतीची दृश्य तपासणी (व्हिज्युअल इन्स्पेक्शन) केली होती. सर्व गोष्टींचा अभ्यास करत त्यांनी अहवाल सादर केला.
अहवालात कला अकादमीतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. इमारतीची संरचनात्मक क्षमता सखोलपणे तपासण्यासाठी इन्फ्रारेड आणि थर्मल स्कॅनिंग करण्याची शिफारस आयआयटी मद्रासने केली आहे.
टास्क फोर्सचे सदस्य फ्रान्सिस कुएल्हो यांनी सांगितले की, नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आलेले ५० कोटी रुपये म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे. या निधीपैकी १० कोटींची रक्कम सध्या रोखून ठेवण्यात आली आहे.
कला अकादमी पुढील पन्नास वर्षे सुरक्षित ठेवायची असेल तर आयआयटी मद्रासने दिलेल्या अहवालातील शिफारसींवर तातडीने अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.
आम्ही पुन्हा एकदा पुढील महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्यानंतर पाठपुरवठा बैठक घेतली जाईल. बैठकीदरम्यान काही सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न असताना कला अकादमीचा वापर सध्या कसा सुरू आहे? कलाकार, कर्मचारी आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा येथे उपस्थित होतो, असेही कुएल्हो यांनी सांगितले.