सरत्या वर्षात घातला ३७३ कोटींचा गंडा; १६ कोटी वाचविले, १.११ कोटी वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:39 IST2025-12-29T07:39:46+5:302025-12-29T07:39:46+5:30
सायबर गुन्हेगारीचा विळखा

सरत्या वर्षात घातला ३७३ कोटींचा गंडा; १६ कोटी वाचविले, १.११ कोटी वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२५ या वर्षात गोव्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, सायबर गुन्हेगारांनी गोमंतकीय नागरिकांना ३७३.६९ कोटींहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
गोवापोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडून २६ डिसेंबर २०२५ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात २२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ५० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामधील २९ प्रकरणांचा शोध लावण्यात आला असून ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ५ प्रकरणांचा अंतिम निकाल लावण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय १९३० सायबर हेल्पलाईन व पोर्टलवरून गोव्यात ४,७११ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, या प्रकरणांतील फसवणुकीची एकूण रक्कम ११७.५७ कोटी इतकी आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी संशयास्पद कॉल, लिंक व आमिषांना बळी न पडता कोणतीही फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
१६ कोटी वाचविले, १.११ कोटी वसूल
सायबर फसवणूक रोखण्यासाठी तातडीची कारवाई करत गोवा सायबर पोलिसांनी १६.२९ कोटींची रक्कम विलग (लीन) करून ती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाण्यापासून वाचवली आहे. तसेच तपासादरम्यान १.११ कोटींची रक्कम पीडितांना मिळवून दिले आहेत.