दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन कोटी अर्थसाह्य मंजूर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:05 IST2026-01-13T08:04:22+5:302026-01-13T08:05:38+5:30
उर्वरित रक्कमही लवकरच होणार अदा

दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन कोटी अर्थसाह्य मंजूर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची थकित असलेली आधारभूत किंमत निधी वितरण अंतर्गत सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना तीन कोटी अर्थसाहाय्य मंजूर झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची रक्कमही काही दिवसांत जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
१२ जानेवारीपर्यंत सुमारे दोन कोटी आधारभूत निधी २१५२ शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेले आहेत. तसेच सोमवारी खात्यातर्फे सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांना एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
आगामी दोन दिवसांत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच उर्वरित थकबाकी आहे, ती टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे दूध उत्पादक समाधानी दिसत आहेत.
मागणीची दखल
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी सुमारे आठ महिन्यांची आधारभूत किंमत थकल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी केली होती. तसेच यासंदर्भात डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसेच पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही शेतकऱ्यांच्या थकबाकीची दखल घेतली आहे.
आश्वासनाची पूर्तता...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांना आधारभूत किंमत शक्य तेवढ्या लवकर वितरित करण्यासाठी आवश्यक सोपस्कार गतिमान करण्यात येतील, अशी माहिती दिली. शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी बैठक घेऊन दूध दरात वाढ करण्याची तसेच थकबाकी तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेताना सुमारे तीन कोटी आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मंजूर करून दोन कोटी खात्यावर जमा केल्याचे सांगितले. आज मंजूर झालेली एक कोटी रक्कम दोन दिवसात जमा होईल असे सांगितले.
त्रुटी दूर करून तोडगा काढू
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुखण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत असून ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांची चर्चा करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.