पणजीत १७ नवे बायोमिथेनेशन मिनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:58 IST2020-08-11T21:57:27+5:302020-08-11T21:58:03+5:30
केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मिळणार असून २ कोटी रुपये महापालिका १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करणार आहे.

पणजीत १७ नवे बायोमिथेनेशन मिनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार
पणजी : गोव्याच्या या राजधानी पणजी शहरात कचरा विल्हेवाटीसाठी महापालिका १७ नवे बायोमिथेनेशन छोटेखानी प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण सर्व मिळून ५ टन क्षमतेचे हे प्रकल्प शहरात ठिकठिकाणी येणार आहेत. या प्रकल्पांवर एकूण ७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. महापौर उदय मडकईकर यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मिळणार असून २ कोटी रुपये महापालिका १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करणार आहे. राजधानी शहरात सध्या रोज सुमारे ३0 टन ओला कचरा तयार होतो. हॉटेलांचा आणि घराघरांमध्ये किचनचा हा कचरा असतो. हॉटेले सध्या बंद असल्याने काही प्रमाणात ओला कचरा कमी झालेला आहे. ओला कचरा शहरात ठिकठिकाणी असलेल्या कंपोस्टिंग कें द्रात तसेच पाटो येथे एलआयसी मुख्यालयाजवळ असलेल्या प्रकल्पात जातो. १0 टन ओला कचरा रोज साळगांव येथील प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो, असे महापौरांनी सांगितले.
मळा येथे तळ्याजवळ, आल्तिनो येथे राखीव पोलीस दलाच्या परिसरात, कदंब बसस्थानकानजीक २, ट्रान्स्पोर्ट भवनजवळ, महापालिका गॅरेज परिसरात, सिने नॅशनल थिएटरजवळ, रोझ गार्डन परिसर, जॅक सिक्वेरा मार्गावर, कांपाल येथील सुलभ शौचालयानजीक, सांतइनेज येथे महापालिकेच्या अॅनिमल शेल्टरजवळ, पोलीस मुख्यालयाजवळ तसेच आल्तिनो येथे पॉलिटेक्निकनजीक व अन्यत्र हे प्रकल्प येतील. टोंक, करंझाळे येथे अशा प्रकारचे बायोमिथेनेशन प्रकल्प आहेत, अशी माहिती मडकईकर यांनी दिली. सध्या टोंक, करंझाळे येथील बायोमिथेनेशन प्रकल्पातून निर्माण होणारा वायू हॉटेलांना स्वयंपाकाचा गॅस म्हणून वापरता येतो.
असे येतील बायोमिथेनेशन कचरा प्रकल्प
मळा, रुअ द औरें १५0 किलो
मळा तलावाजवळ ७५ किलो
सिने नॅशनल - १ ५00 किलो
जीआरपी,आल्तिनो १५0 किलो
मनपा गॅरेज आवार ३00 किलो
सिने नॅशनल - २ ५00 किलो
पोलीस मुख्यालय १५0 किलो
पॉलिटेक्निक आल्तिनो १५0 किलो
ट्रान्स्पोर्ट भवनजवळ १000 किलो
आंतरराज्य बसस्थानक - १ ३00 किलो
आंतरराज्य बसस्थानक -२ १५0 किलो
आंतरराज्य बसस्थानक -३ ७५ किलो
मळा तलावानजीक -३ ५00 किलो
रोझ गार्डनजवळ ७५ किलो
करंझाळे जॅक सिक्वेरा मार्ग ५00 किलो
सांतइनेज अॅनिमल शेल्टर ३00 किलो
परेड मैदान, कांपाल १५0 किलो