नोकऱ्यांसाठी मंत्री, अधिकाऱ्यांना १७ कोटी दिले; मुख्य संशयित पूजा नाईकच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:49 IST2025-11-08T08:48:29+5:302025-11-08T08:49:07+5:30
पूजा हिने २४ तासांच्या आत १७ कोटी रुपयांची रक्कम परत न केल्यास संबंधितांची नावे उघड करण्याची धमकीही दिली.

नोकऱ्यांसाठी मंत्री, अधिकाऱ्यांना १७ कोटी दिले; मुख्य संशयित पूजा नाईकच्या आरोपाने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सरकारी नोकरी घोटाळ्यात मंत्री, आयएएस अधिकारी आणि पीडब्ल्यूडी अभियंत्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने शुक्रवारी केला. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पूजा हिने २४ तासांच्या आत १७ कोटी रुपयांची रक्कम परत न केल्यास संबंधितांची नावे उघड करण्याची धमकीही दिली.
२०१९ ते २०२१ च्या अखेरपर्यंत या कालावधीत नोकऱ्यांसाठी हे पैसे घेतल्याचे पूजा नाईकने म्हटले आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना पूजा नाईकने सांगितले की, तिने २०१९ मध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सुमारे ६०० हून अधिक जणांकडून पैसे घेतले आणि या इच्छुक उमेदवारांच्यावतीने तिने हे पैसे आयएएस अधिकारी आणि पीडब्ल्यूडी अभियंत्यांना दिले. ही रक्कम सुमारे १७ कोटी रुपये असून हे पैसे रोख दिल्याचे पूजाने म्हटले आहे.
संबंधितांच्या नोकरीच्या अर्जासह हे पैसे पर्वरीमधील या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच सचिवालयातही देण्यात आल्याचा आरोप पूजा नाईकने केला आहे. मात्र यापैकी एकाही अर्जदाराला नोकरी देण्यात आली नाही. पूजा ही प्रत्येक अर्जासाठी कमिशन घेत होती. २०१९ पासूनच्या कालावधीतील नोकऱ्यांशी संबंधित हा व्यवहार असल्याचे तिचे म्हणणे आहे.
कमिशन मिळत होते...
पूजाने सांगितले की, तिला या नोकऱ्यांसाठी कमीशन दिले जात होते. यामध्ये दोनच व्यक्ती रोखीत व्यवहार करत होत्या. संबंधितांना तिने सचिवालय आणि पर्वरीतील कार्यालयात हे पैसे दिले असल्याचे म्हटले आहे. पैसे परत करण्यासाठी २४ तासांची मुदत तिने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
मी ज्या लोकांना पैसे दिले, त्या लोकांनी माझे पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे मी अर्जदारांना शक्य त्या मार्गाने पैशांची परतफेड करत आहे असे पूजा हिने म्हटले आहे. याविषयी मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटणार आहे. शिवाय, प्रसार माध्यमांसमोर मुख्य आरोपींची नावे उघड करेन, असा इशाराही पूजा नाईकने दिला आहे. एक आयएएस अधिकारी आणि पीडब्ल्यूडीमधील एक वरिष्ठ अधिकारी पैसे परत देण्याबाबत टोलवाटोलवी करत असल्याचे तिने सांगितले. या नोकरी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नसल्याचे तिने म्हटले आहे.