गोव्यात पुन्हा सत्तेचे राजकारण जोरात, काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांना भेटणार असल्याचा भाजपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:51 IST2018-05-11T22:51:59+5:302018-05-11T22:51:59+5:30
हे आमदार कोण आहेत असे विचारले असता राणे यांनी ‘मेळाव्याच्या दिवशी तुम्हीच पहा’ असे पत्रकारांना सांगितले.

गोव्यात पुन्हा सत्तेचे राजकारण जोरात, काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांना भेटणार असल्याचा भाजपाचा दावा
पणजी: काँग्रेसचे दोन आमदार हे भाजपच्या संपर्कात असून रविवारी गोव्यात येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही ते भेट घेणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे.
भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले, की ‘मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आरोग्याच्या कारणावरून विदेशात उपचारासाठी असताना काँग्रेसकडून अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. सरकार स्थापन करण्याची संधी राज्यपालांकडे मागणाऱ्या काँग्रेसने आपल्या आमदारांवरच अगोदर लक्ष्य ठेवावे. काँग्रेसचे किमान दोन आमदार हे भाजपच्या संपर्कात असून १३ मे रोजी गोव्यात येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही ते भेट घेणार आहेत.
हे आमदार कोण आहेत असे विचारले असता राणे यांनी ‘मेळाव्याच्या दिवशी तुम्हीच पहा’ असे पत्रकारांना सांगितले. आपल्याला जी माहिती आहे तीच आपण सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कॉंग्रेसने उगाच आपली शक्ती इकडे तिकडे वाया घालविण्याऐवजी आपल्याच पक्षासाठी खर्च करावी असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे नेते रमाकांत खलप यांच्यावरही त्यांनी टीका केली. खलप यांनी कायदा पुन्हा समजून घेण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. त्यांना आपल्याच मतदारसंघातील मतदारांनी नाकारल्यामुळे ते कधी आमदार बनु शकले नसल्याचाही टोला त्यांनी हाणला.