विषारी दारू पिल्याने युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 30, 2014 23:43 IST2014-08-30T23:43:35+5:302014-08-30T23:43:35+5:30
तान्हा पोळाच्या दिवशी विषारी दारू प्राशन करणाऱ्या युवकाचा आरमोरी येथे २८ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

विषारी दारू पिल्याने युवकाचा मृत्यू
वनखी येथील घटना : रूग्णालयात झाला मृत्यू
ठाणेगाव : तान्हा पोळाच्या दिवशी विषारी दारू प्राशन करणाऱ्या युवकाचा आरमोरी येथे २८ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.
आरमोरी तालुक्यातील वनखी येथील विकास श्रीहरी बावणे (२६) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विकास बावणे यांनी तान्हा पोळ्याच्या दिवशी गावातील इतर युवकांसह दारू प्राशन केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आरमोरी येथील एका खासगी रूग्णालयात त्याला उपचारार्थ भरती करण्यात आले होते. परंतु आरमोरी येथील डॉक्टरांनी त्याला ब्रह्मपुरी येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर ब्रह्मपुरी येथील डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीची तपासणी केली असता, प्रकृती गंभीर आढळल्याने नागपुरला हलविण्यास सांगितले. दरम्यान नागपूर येथे उपचार करीत असताना विकास बावणे याचा २८ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. विकास बावणे याचा मृत्यू विषारी दारूमुळेच झाला, असे डॉक्टरांनी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे वनखी परिसरातील दारूमध्ये युरीया, कडुलिंब व इतर पदार्थांची भेसळ होत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. विकास यांच्या पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. वनखी, वैरागड परिसरात होत असलेल्या अवैध दारूच्या विक्रीच्या बंदीसंदर्भात तालुका भाजपच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आरमोरी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे वनखीतील युवकास आपला जीव गमवावा लागला, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कारवाईची मागणीही भाजपने केली आहे. (वार्ताहर)