मोटारसायकलचा टायर फुटला; युवक ठार, दुसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 16:47 IST2023-02-18T16:45:55+5:302023-02-18T16:47:48+5:30
अपघाताचे प्रमाण वाढत असतानाही चालकांचे हेल्मेट घालण्याचे प्रमाण नगण्य

मोटारसायकलचा टायर फुटला; युवक ठार, दुसरा गंभीर जखमी
एटापल्ली (गडचिरोली) : अहेरीवरून एटापल्लीला परत येताना गुरुपल्ली जवळ मोटारसायकलचा टायर फुटून झालेल्या अपघातात एटापल्लीच्या इंदिरा वॉर्डमधील युवक जागीच ठार झाला. अशोक पुसू पुंगाटी (३२) असे मृत युवकाचे नाव आहे. या अपघातात अशोकचे काका टेका पुंगाटी (५०) रा. कृष्णार ता. भामरागड हे जखमी झाले.
अशोक आणि पुसू हे दोघे मोटारसायकलने अहेरीवरून एटापल्लीकडे मुख्य मार्गाने येत होते. एटापल्ली जवळील गुरुपल्ली जवळ मोटारसायकलचा टायर फुटून अशोक जोरात रस्त्यावर आदळला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. त्याचे काका पुसू पुंगाटी हेसुद्धा गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडला. मृत युवकाचे वडील एटापल्ली तहसील कार्यालयात शिपाई आहे.
अपघाताची माहिती मिळताच एटापल्लीचे ठाणेदार विजयानंद पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन एका ट्रॅक्टरमधून त्यांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. डाॅक्टरांनी अशोकला मृत घोषित केले, तर टेका यांच्यावर उपचार सुरू आहे.
हेल्मेटचा वापर नाहीच
अशोक आणि त्याचे काका यांच्यापैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे रस्त्यावर पडताच डोक्याला गंभीर मार लागला. डोक्यात हेल्मेट असते तर अशोक यांचा जीव वाचला असता. ग्रामीण भागात अनेक दुचाकीचालक हेल्मेट न घालताच वाहने चालवितात. अपघाताचे प्रमाण वाढत असतानाही चालकांचे हेल्मेट घालण्याचे प्रमाण नगण्य आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार हिरामण मारटकर करीत आहे.