महिलांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा
By Admin | Updated: August 24, 2014 23:30 IST2014-08-24T23:30:25+5:302014-08-24T23:30:25+5:30
महिलांनी केवळ चुल व मुलं यामध्ये गुंतुन न जाता स्वयंरोजगार करण्याचा प्रयत्न करावा, यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना

महिलांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा
आलापल्ली : महिलांनी केवळ चुल व मुलं यामध्ये गुंतुन न जाता स्वयंरोजगार करण्याचा प्रयत्न करावा, यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना असून या योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करून स्वत:च्या पायावर उभे व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले.
स्थानिक श्रीराम मंदिरात २३ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा. पं. सदस्य महावीर अग्रवाल, कमलाबाई उप्पलवार, गंगु ठाकरे, इंदिरा सडमेक आदी मान्यवर उपस्थित होते. रक्षाबंधन सोहळ्याला मोदूमोडगु, मद्दीगुडम, रामय्यापेठा, वेलगूर, मलमपल्ली, तलवाडा, पेरमिली येथील बचतगट, महिला मंडळाच्या सदस्या व गृहिणी उपस्थित होत्या. सर्व महिलांनी अतुल गण्यारपवार यांना राखी बांधली. यावेळी इतरही मान्यवरांनी महिलांना रोजगाराविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया विठ्ठलानी, संचालन ज्योती कोमलवार तर आभार प्रेमिला फरकाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचत गट व महिला मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)