ग्रामीण भागातील महिला सरपणाच्या शोधात पुन्हा दाहीदिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 19:55 IST2021-09-13T19:52:31+5:302021-09-13T19:55:02+5:30
गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील महिला सरपणाच्या शोधात पुन्हा दाहीदिशा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत शासनाच्या योजनेतून गॅस वितरण करण्यात आले. विविध योजनेतून गॅस वितरण केले, पण आता गॅस महागल्याने पैसे आणायचे कुठून? घरोघरी मातीच्या चुली, अशी म्हण पुन्हा दिसू लागली आहे. सिलिंडरमुळे नवीन पिढीला चुलीचा विसर पडला होता. मात्र, गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. (Women in rural areas turn right again in search of firewood)
ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा वापर वाढला होता. घरोघरी चुली पेटविल्या जात नाहीत, तर काही घरी चुली हद्दपार झाल्या होत्या. ग्रामीण भागात महिला व पुरुष वर्षभरापासून परिसरातून सरपण जमा करत होते. गॅस मिळाल्याने तेही बंद झाले, पण पुन्हा अजून सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे. स्वयंपाक गॅसवर, तर अंघोळीकरिता लागणारे गरम पाणी गॅसवरच गरम करण्यात येत होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर कुटुंबीयांचे आर्थिक बजेट, वीज बिल आणि सिलिंडरमुळे पूर्णत: गरिबांचे बजेट कोलमडले आहे.
सततची नापिकी व कोरोनामुळे अनेक कुटुंबांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे. रोजगारासाठी भटकंती, साहित्यामध्ये दरवाढ, तर कामामध्ये मात्र वेतन कमी असल्याने नागरिकांना महागडा गॅस परवडणार काय? महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे अनेक कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी दिसणार आहे. महिलांसोबत पुरुषही परिसरातून सरपण गोळा करून सायकलद्वारे आणत असल्याचे चित्र लवकरच दिसून येणार आहे.