प्लाटून कमांडरसह एक महिला नक्षलवादी ठार, घातपाताचा डाव उधळला; जंगलात चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 06:10 IST2021-05-14T06:06:06+5:302021-05-14T06:10:23+5:30
डीआयजी संदीप पाटील यांच्यासह एएसपी (ऑपरेशन) मनीष कलवानिया यांनी सांगितले की, धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक शोधमोहीम राबवत होते.

प्लाटून कमांडरसह एक महिला नक्षलवादी ठार, घातपाताचा डाव उधळला; जंगलात चकमक
गडचिरोली: पोलिसांचे सी-६० पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी उडालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून १५ चा कमांडर राजा ऊर्फ रामसाई नोहरू मडावी व एक महिला नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून दोघांवर मिळून १४ लाखांचे बक्षीस होते.
डीआयजी संदीप पाटील यांच्यासह एएसपी (ऑपरेशन) मनीष कलवानिया यांनी सांगितले की, धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक शोधमोहीम राबवत होते. सकाळी ६ ते ६.३० जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस पथकाने प्रत्युत्तर दिले. त्यात दोन नक्षल्यांचा खात्मा झाला. घटनास्थळावरून एसएलआर रायफल, ८ एमएम रायफल, कुकर बॉम्ब व आईडी अशा स्फोटक साहित्यांसह नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य जप्त केले.
१४ लाखांचे होते बक्षीस
दोघांचेही मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणून ओळख पटविण्यात आली. त्यातील मृत नक्षल कमांडर राजा मडावी (३३) याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे ४४ गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याच्यावर १२ लाखांचे बक्षीस होते. तसेच रनिता ऊर्फ पुनिता चिपळूराम गावडे (२८) हिच्यावर खून, चकमक, शस्त्र व स्फोटक कायद्यासह ९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.
उत्तर गडचिरोलीत चळवळ खिळखिळी
काही दिवसांपूर्वीच टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून कमांडर भास्कर मारला गेला होता. त्यानंतर या भागाची जबाबदारी राजा ऊर्फ रामसाई मडावी याच्याकडे आली होती. आता तोसुद्धा मारल्या गेल्यामुळे उत्तर गडचिरोली भागातून नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.