जादूटोनाच्या संशयावरून हत्या

By Admin | Updated: August 17, 2016 01:33 IST2016-08-17T01:33:21+5:302016-08-17T01:33:21+5:30

जादूटोना केल्याच्या संशयावरून तालुक्यातील बटेली या गावातील मुन्सी मज्जी आत्राम (५०) या इसमाची गावातील ...

Witchcraft murders | जादूटोनाच्या संशयावरून हत्या

जादूटोनाच्या संशयावरून हत्या

बटेली गावातील घटना : मारहाण करणाऱ्या पाच आरोपींवर गुन्हा दाखल
भामरागड : जादूटोना केल्याच्या संशयावरून तालुक्यातील बटेली या गावातील मुन्सी मज्जी आत्राम (५०) या इसमाची गावातील पाच लोकांनी मिळून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली.
राजू इरपा नरोटी, पांडू आत्राम, मधुकर आत्राम, विष्णू मडावी, सतू झुरू मडावी अशी आरोपींची नावे आहेत. मृतक मुन्सी आत्राम हा गावातील नागरिकांना जादूटोना करतो. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे, असा सशंय गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. जादूटोनाच्या संशयावरूनच आरोपी व मृतक मुन्सी आत्राम यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणादरम्यान आरोपींनी मुन्सीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मुन्सीचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार मुन्सीच्या नातेवाईकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात दाखल केली. पोलिसांनी तपासानंतर आरोपींविरोधात कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. मुन्सीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भामरागड येथे मंगळवारी आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतकाला दोन पत्नी आहेत. यातील पहिल्या पत्नीस तीन मुले, एक मुलगी व मोठ्या पत्नीस एक मुलगी असा आप्त परिवार आहे. दुर्गम भागात अज्ञानामुळे जादूटोना केल्याच्या संशयावरून मारहाणीच्या घटना यापूर्वीसुध्दा घडल्या आहेत. विशेष करून ताडगावचा परिसरातील जंगल भागात वास्तव्यास असलेल्या गावांमध्ये या घटना अधिक घडतात. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Witchcraft murders