दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 03:06 PM2022-09-23T15:06:11+5:302022-09-23T15:06:54+5:30

९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल

Wife killed due to suspicion of character, body hidden in hay; Accused husband sentenced to life imprisonment | दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

गडचिरोली : टरबुजाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतात झोपडी तयार करून राहणाऱ्या बंगाली दाम्पत्यापैकी पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबत १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

मूळचे छत्तीसगडमधील पाखांजूर येथील रहिवासी असलेला प्राणवल्लभ राधाकांत राजवंशी (४७ वर्षे) आणि त्याची पत्नी कल्पना हे दाम्पत्य आरमोरीजवळील देऊळगाव येथे डिसेंबर २०१२ मध्ये टरबुजाची शेती करण्यासाठी आले होते. हे दाम्पत्य शेतातच झोपडी उभारून तिथे राहात होते. कल्पना हिचे हे दुसरे लग्न होते. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि प्राणवल्लभ याच्यापासून दुसरा मुलगा झाला होता.

मार्च २०१३ मध्ये होळी सणाच्या निमित्ताने दोन्ही मुले पाखांजूर येथे मूळ गावी गेली होती. त्याच वेळी प्राणवल्लभ आणि पत्नी कल्पना यांच्यात रात्री ८ ते ८.३० वाजतादरम्यान भांडण झाले. त्यातून प्राणवल्लभने नायलॉन दोरीने पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह तणसाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला.

या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी आरोपी प्राणवल्लभ याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तसेच कलम २०१ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस.यु. कुंभारे यांनी काम पाहिले.

महिनाभरानंतर सापडला सांगाडा

कल्पनाचा तणसात लपवलेला मृतदेह काही दिवसांनी नरेंद्र मोतीराम बनपूरकर यांना दिसला. भाऊराव दहीकर यांच्या शेताजवळील तुळशीराम शेंडे यांच्या शेतातील तणसाच्या ढिगाजवळ एका महिलेचा सांगाडा पडलेला असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. दहीकर यांच्या शेतात झोपडी करून राहणाऱ्या बंगाली दाम्पत्यातील महिला महिनाभरापासून बेपत्ता आहे. त्यामुळे तो सांगाडा तिचाच असावा, असाही संशय व्यक्त केला. त्यामुळे आरमोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी तपास सुरू केला.

फोन बंद करून प्राणवल्लभ पसार

दरम्यान, सदर घटनेपासून प्राणवल्लभने आपला मोबाइल बंद ठेवला होता. त्यामुळे कल्पनाचा भाऊ मनोहर महानंद विश्वास याला संशय आला. त्याने पोलिसांकडे असलेले मृतदेहाचे (सांगाड्याचे) फोटो पाहिल्यानंतर हातातील बांगड्या, नाकातील नथ, गळ्यातील काळा धागा आपल्या बहिणीचेच असल्याचे सांगितले.

...म्हणून होता दोघांमध्ये वाद

प्राणवल्लभ आणि कल्पना यांच्यासाठी भावाने खरेदी केलेली दुचाकी आपल्या नावावर का खरेदी केली नाही, या मुद्द्यावरून प्राणवल्लभ वाद घालत होता. तसेच तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, अशी माहिती मृत कल्पनाच्या भावाने पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Wife killed due to suspicion of character, body hidden in hay; Accused husband sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.