आरोग्य सेवक नियुक्तीचा मुहूर्त कधी निघणार? अंतिम निवड यादी घोषित होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:09 IST2025-04-05T16:08:31+5:302025-04-05T16:09:11+5:30
Gadchiroli : जिल्हाभरातील पात्र उमेदवारांची घालमेल; जि.प. प्रशासनाविषयी नाराजी

When will the deadline for the appointment of health workers be? The final selection list has not been announced.
गोपाल लाजूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) पद भरतीअंतर्गत १२३ पदांच्या भरतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२३ पासून जाहिरातीद्वारे राबविण्यात आली. आता दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. अंतिम निवड यादी घोषित न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे.
आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी २४ जुलै २०२४ मध्ये म्हणजेच जवळपास वर्षभरानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. याद्वारे निवड झालेल्या नॉनपेसा उमेदवारांची १८ सप्टेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली; परंतु १४ ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पदभरतीत प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानंतर शिल्लक जागेवर मेरिटनुसार नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट केले, तसेच पेसा उमेदवारांची ९ व १० डिसेंबर २०२४ रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली नाही.
इतर जिल्ह्यांत नियुक्ती, गडचिरोलीत केव्हा?
- ज्या उमेदवारांकडे २० दिवसांचे हंगामी फवारणीचे प्रमाणपत्र होते. अशा ९ उमेदवारांची यादी २७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
- विशेष म्हणजे यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोदिया, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र गडचिरोलीत केवळ हंगामी २ उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे. हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी गुणवत्ताधारक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
६३ दीड वर्षापासून उमेदवारांचे हेलपाटे
जागा पैसा क्षेत्र व ६० नॉनपेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी १ हजार १०० हून अधिक उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते.
शासन आदेशाचा अंमल केव्हा?
- आरोग्य सेवक पदभरती प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र ६ मार्च २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने १५ ऑक्टोबर २०२४ च्या परिपत्रकाला अनुसरुन निर्णय दिला.
- तसेच १२ मार्च २०२५ रोजी निवड प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. २८ मार्च रोजी नागपूर विभागीय आयुक्तांनी भरती प्रक्रियेस परवानगीचे आदेशही दिले; परंतु अजूनपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.