आठवडी बाजार तुरळक भरला !
By Admin | Updated: June 29, 2014 23:53 IST2014-06-29T23:53:14+5:302014-06-29T23:53:14+5:30
रस्त्याच्या मागणीसाठी गुजरी भाजी विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन सुरू करून आठवडी बाजार बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान रविवारी या गुजरी व्यापाऱ्यांच्या

आठवडी बाजार तुरळक भरला !
भाज्या कडाडल्या : प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पोलीस बंदोबस्तात बाजार सुरू
गडचिरोली : रस्त्याच्या मागणीसाठी गुजरी भाजी विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन सुरू करून आठवडी बाजार बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान रविवारी या गुजरी व्यापाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेऊन प्रशासनाने मध्यस्ती केल्यानंतर रविवारी आठवडी बाजार भरला. मात्र दूरवरचे व्यापारी आठवडी बाजारात आले नाही. यामुळे केवळ ६० ते ७० विक्रेत्यांच्या भरवशावरच तुरळक बाजार भरला. परिणामी भाज्यांचे भाव कडाडले होते.
नगर परिषद प्रशासनाने गुजरी भाजी बाजारामध्ये जड वाहन ने-आण करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता निर्माण करून द्यावा, या मागणीसाठी सर्वोदय सब्जी व्यापारी असोसिएशनने २५ जून बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान मागणी कडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून शुक्रवारी दिला होता. दरम्यान, रविवारी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व गुजरी भाजी विक्रेते सकाळी १० वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात गोळा होऊन या बाजारामध्ये भाजीपाल्याचे दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांना विरोध करू लागले. जोपर्यंत गुजरीमध्ये कायमस्वरूपी रस्ता निर्माण होणार नाही. तोपर्यंत आठवडी बाजार भरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र ढाके, नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार यांनी आठवडी बाजारात येऊन गुजरी असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांची व विक्रेत्यांची समजूत घातली. पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आठवडी बाजार चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाला. मात्र रविवारच्या आठवडी बाजारामध्ये दूरवरून मोठ्या संख्येने विक्रेते आले नाही. तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकही आले नाही. त्यामुळे आठवडी बाजार नेहमीप्रमाणे गच्च भरला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)