लाहेरी येथील कोट्यवधींची पाणी पुरवठा योजना निकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:34 IST2025-03-19T15:33:26+5:302025-03-19T15:34:06+5:30
पाइपलाइनचे काम सदोष : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले बांधकाम

Water supply scheme worth crores in Laheri fails
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : भामरागड तालुक्यांतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शासनाने येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याला बराच कालावधी लोटूनही ती सुरू झाली नाही. म्हणून परत चार वर्षापूर्वी नव्याने काम हाती घेण्यात आले; मात्र ही पाणीपुरवठा योजना अजूनपर्यंत सुरू झाली नसल्याने या जलकुंभाचा वनवास कधी संपणार ? असा प्रश्न येथील उपस्थित केला जात आहे.
भामरागड तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी गावाची जवळपास तीन हजार लोकसंख्या आहे. या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता २००९-१० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले.
योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली
- काही ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
- उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात २ घेऊन प्रशासनाने सदर योजना त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
- कोट्यवधी रूपयांची पाणी पुरवठा योजना असतानाही स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विहीर व हातपंपाचा उन्हाळ्यात वापर
योजना सुरू नसल्यामुळे येथील नागरिक बोअरवेल, विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून लाहेरीवासीयांसाठी निर्माण केलेली नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.