सदोष कामाने रस्त्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:24+5:30
मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर पाणी जमा होत आहे. या कामावर पालिकेचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र उद्देश सफल झाल्याचे अजूनही दिसून येत नाही.

सदोष कामाने रस्त्यावर पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य बाजारपेठ तसेच गांधी वॉर्ड परिसरात भूमिगत नाल्या बांधण्यात आल्या. मात्र या नाल्या योग्यरित्या बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोलीकरांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली शहराला पावसाने झोडपले. परिणामी गांधी वॉर्डातील मुख्य बाजारपेठेतील नाल्या तुडूंब भरून रस्त्यावर पाणी साचले.
मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर पाणी जमा होत आहे. या कामावर पालिकेचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र उद्देश सफल झाल्याचे अजूनही दिसून येत नाही.
न.प. प्रशासनाला दरवर्षी विविध योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त होत असतो. मात्र विकास कामाचे योग्य नियोजन करून कामात दर्जा राखला जात नसल्याने शहरातील भूमिगत नाली बांधकाम व इतर कामांची पूर्णत: वाट लागली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणचे नाली व रस्ते बांधकाम सदोष पध्दतीने झाल्याचा आरोप शहरवासीयांकडून होत आहे. सदोष विकासकामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.
न.प. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी नाली व रस्त्याचे बांधकाम केले जाते. मात्र चार ते पाच वर्षापूर्वी बांधलेली नाली फोडून त्या ठिकाणी नव्याने नाली बांधकाम केल्याचाही प्रकार शहरात दिसून येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी नाली बांधकाम होत नसल्याची ओरड शहरवासीयांकडून होत आहे. बाजारपेठ परिसरातीलच रस्त्याची दुरूस्ती व नाली बांधकाम वारंवार केले जात असल्याचे दिसून येते. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी शनिवारला अल्पशा पावसाने या रस्त्यावर असेच पाणी साचले होते. मुख्य बाजारपेठेतील दुकानदार व ग्राहकांना या समस्येचा पावसाळ्यात सामना करावा लागतो.
डुकर बंदोबस्ताकडे दुर्लक्ष
नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दोन ते अडीच वर्षांपूर्वी डुकर बंदोबस्त मोहीम राबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मोहीम पूर्णत: थंडबस्त्यात पडली. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुलनगर, आशीर्वादनगर, स्नेहनगर, फुलेवॉर्ड व इतर भागात डुकरांचा हैदोस वाढला आहे.