वैनगंगा आटली, जलसंकट होणार तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:32 IST2019-03-03T22:32:14+5:302019-03-03T22:32:43+5:30
गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वैनगंगा आटली, जलसंकट होणार तीव्र
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नदी पात्रात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला दोन वॉल्व देण्यात आले आहेत. त्यापैकी एक वॉल्व पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आला आहे. तर केवळ एक वॉल्व पाण्यामध्ये आहे. एक महिन्यापूर्वीच पाणी पातळी कमी झाली होती. नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पार बांधून विहिरीच्या बाजुने धार वळविली होती. विहिरीजवळ सुध्दा एक पार बांधून पाणी अडवून ठेवले. मात्र पाणी पातळी कमी झाल्याने केवळ एकाच वॉल्व मधून पाणी पुरवठा होत आहे. पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरणे अशक्य झाले आहे.
मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात पाणी संकट तीव्र होणार आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरत नसल्याने काही दिवस कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात होता. तीच स्थिती यावर्षीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात पुन्हा पाणी पातळी घटणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- मुक्तेश्वर काटवे,
पाणी पुरवठा सभापती,
नगर परिषद गडचिरोली