६४० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:09 IST2019-05-09T22:08:59+5:302019-05-09T22:09:38+5:30
शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे.

६४० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील रबी हंगामात जिल्हाभरात एकूण ६४० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर वांग्याचे पीक बहरले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, मुलचेरा व एटापल्ली हे तीन तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये शासन प्रशासनाच्या माध्यमातून काही प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच काही प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन सिंचन विहीर खोदली. त्यावर मोटारपंप बसवून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील अनेत शेतकरी आता खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात दुबार पिके घेत आहेत. गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी व चार तालुक्यात मिळून रबी हंगामात २१ हेक्टर क्षेत्रावर टरबुजाची लागवड करण्यात आली. ८० हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक आरमोरी तालुक्यात ५८ हेक्टर इतके मिरची पिकाचे क्षेत्र आहे.
१३६ हेक्टर क्षेत्रावर वांगी पिकाची लागवड करण्यात आली. आरमोरी तालुक्यात ६९ हेक्टर, त्याखालोखाल देसाईगंज व गडचिरोली तालुक्याचा क्रमांक लागतो. ७७ हेक्टर क्षेत्रावर कारले, तर ८६ हेक्टर क्षेत्रावर टमाटर पिकाची लागवड करण्यात आली.
६० हेक्टर क्षेत्रावर पताकोबी व २४ हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी पिकाची लागवड करण्यात आली. नऊ हेक्टर क्षेत्रावर कोथिंबीर तर २० हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक घेतले जात आहे. एकूण ५३ हेक्टर क्षेत्रावर इतर प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे. दुबार पिकामुळे शेतकरी प्रगतीवर आहेत.
आरमोरी तालुका आघाडीवर
आरमोरी तालुक्याच्या वैरागड, वासाळा, वनखी, भाकरोंडी व इतर परिसरात सिंचनाच्या सुविधा शेतकºयांनी निर्माण केल्यामुळे या भागात दोन्ही हंगामात पिके घेतली जात आहेत. यंदाच्या रबी हंगामात आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २७१ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये मिरची, वांगी, कारले, टमाटर, फुलकोबी, भेंडी आदींचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यानंतर देसाईगंज व त्याखालोखाल गडचिरोली व कुरखेडा तालुक्याचा भाजीपाला पिकाचा क्रमांक लागतो.
६१ हेक्टरवर भेंडीचे पीक, सिरोंचा तालुक्यातही लागवड
नागरिकांकडून भेंडीच्या भाजीला अधिक पसंती आहे. त्यामुळे दरवर्षीच्या उन्हाळ्यात भेंडी खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणच्या बाजारात नागरिक गर्दी करतात. यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्याच्या सात तालुक्यातील एकूण ६१ हेक्टर क्षेत्रावर भेंडी पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यात १४ हेक्टर, आरमोरी तालुक्यात २४ हेक्टर, चामोर्शी ६ हेक्टर, सिरोंचा १२ हेक्टर, देसाईगंज ३ हेक्टर, अहेरी तसेच कोरची तालुक्यात एक हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.